धक्कादायक ! अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर खुल्या प्रवर्गातील व्यक्तीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 02:38 PM2020-09-04T14:38:56+5:302020-09-04T14:40:35+5:30
बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार
- राम शिनगारे
औरंगाबाद : बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागातील दोनपैकी एक जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असताना त्या जागेवर खुल्या प्रवर्गातील व्यक्तीची निवड केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याविषयी पुराव्यानिशी तक्रार बामुक्टो प्राध्यापक संघटनेने कुलगुरूंकडे केली आहे. यावर प्रशासनाने ११ सप्टेंबरपर्यंत मूळ कागदपत्रांसह खुलासा करण्याचे आदेश महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले आहेत.
विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या मूळ नियुक्तीचा वाद विकोपाला गेला आहे. त्यावरून दररोज आंदोलने होत आहेत. त्यापूर्वी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे बामुक्टो प्राध्यापक संघटनेतर्फे बदनापूर महाविद्यालयातील गैरप्रकाराविषयी तक्रार दिलेली आहे. यानुसार कुलगुरूंनी न्यायालयीन चौकशी समितीही नेमलेली आहे. संघटनेच्या श्री निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विषयाच्या दोन जागांसाठी २३ जुलै १९९८ रोजी जाहिरात देण्यात आली होती.
यातील एक जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होती. या जागेवर डॉ. एस. एस. शेख यांची निवड करण्यात आली. नियुक्तीवेळी त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले होते. त्या आधारावर विद्यापीठ प्रशासनाने २१ आॅगस्ट १९९८ रोजी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. मात्र, डॉ. शेख यांनी त्यानंतर सर्व लाभ घेताना खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दाखविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार तत्कालीन सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी डॉ. शेख यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ मूळ कागदपत्रे सादर केल्याशिवाय मंजूर करण्यास नकार दिला होता. मात्र, विद्यमान सहसंचालक डॉ. दिगांबर गायकवाड यांनी पदभार घेताच महाविद्यालयास भेट देत वादग्रस्त प्रकरण निकाली काढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने डॉ. शेख यांच्या नियुक्तीसंदर्भात ११ मुद्यांसंदर्भातील मूळ कागदपत्रे घेऊन ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
दुसऱ्या जागेवर पत्नीची निवड
बदनापूर येथील महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागातील दोन जागांपैकी एका जागेवर डॉ. शेख यांच्या पत्नीची निवड केलेली आहे, तर राखीव जागेवर डॉ. शेख यांची निवड केली. विद्यापीठ प्रशासन, सहसंचालक कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांत डॉ. शेख हे खुल्या प्रवर्गातून नियुक्त झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, व्हाईटनर लावून कागदपत्रांत खाडाखोड केल्याचे बामुक्टो संघटनेतर्फे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संस्थाचालक साडू, प्राचार्य मेहुणी असल्यामुळे हा प्रकार आतापर्यंत चालला असल्याचेही संघटनेतर्फे सांगण्यात आले.
माझी निवड खुल्या प्रवर्गात
माझी निवड खुल्या प्रवर्गात झालेली आहे. संघटना चुकीची कागदपत्रे देऊन दिशाभूल करीत आहे. माझ्याकडे असलेली कागदपत्रे खरी आहेत. शारीरिक शिक्षण संचालक पदावर नियुक्ती असून, पत्नीची निवड विषयासाठी झालेली आहे. त्यामुळे विद्यापीठाने कारवाई केल्यास पुढील मार्गाचा अवलंब केला जाईल, असे डॉ. एस. एस. शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.