धक्कादायक ! औरंगाबादेत दिवसाआड लैंगिक अत्याचार; घाटीत वर्षभरात झाले दीडशेवर पीडितांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:34 PM2018-04-20T14:34:06+5:302018-04-20T14:35:47+5:30
चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेने देशभरात तीव्र पडसाद उमटत असताना घाटी रुग्णालयात एक दिवसाआड लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला-मुली उपचारासाठी दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेने देशभरात तीव्र पडसाद उमटत असताना घाटी रुग्णालयात एक दिवसाआड लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला-मुली उपचारासाठी दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात दीडशेवर पीडितांवर उपचार झाल्याने याप्रकरणी चिंता व्यक्त केली जात आहे.
निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे झाले, तरीही दिवसेंदिवस अशा घटना समोर येतच आहेत. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचाराने पीडिता उपचारासाठी दाखल होतात. पोलीस, न्यायालयाच्या माध्यमातून, तर कधी पीडित स्वत: घाटीत येत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. पीडितांवर उपचार, गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई होण्याच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी अहवाल तयार आदी प्रक्रिया पार पाडली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पीडितांवरील उपचारांसंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. पीडितांवर उपचार करताना त्यांच्यासोबत सहानुभूती आणि सन्मानपूर्वक व्यवहाराची आवश्यकता असते. घटनेमुळे मानसिक धक्क्यातून सावरणे, मानसिकरीत्या बळकटी देणे हादेखील उपचारांचाच भाग बनला आहे. यादृष्टीने घाटीतील डॉक्टर्स, कर्मचारी पूर्णपणे प्रयत्नशील असतात.
आदर्श उपचार पद्धती करणार लागू
मुंबईतील प्रशिक्षणानंतर पीडित मुली-महिलांना सन्मानपूर्वक पद्धतीने उपचार करावेत, त्यांचे मनोबल वाढवावे, ही पद्धत घाटीत वापरली जाईल. या सगळ्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला पाठविण्यात येईल. या प्रकल्पात औरंगाबाद आणि मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निवड झाली आहे. या दोन्ही रुग्णालयात वापरल्या जाणाºया पद्धतीचा अहवाल पाहिल्यानंतर मार्गदर्शक तत्त्व जाहीर होईल. ही आदर्श उपचार पद्धती म्हणून देशभरात लागू केली जाईल.
उपचारांसंदर्भात डॉक्टरांना मुंबईत प्रशिक्षण
कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराने पीडित महिला, मुलींवर उपचारांसंदर्भात मार्गदर्शकप्रणाली वापरली जावी, यासाठी घाटीतील १८ डॉक्टर आणि कर्मचाºयांचे पथक तीनदिवसीय प्रशिक्षणासाठी मुंबईमध्ये आयोजित कार्यशाळेला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, घाटी रुग्णालयाची निवड केली आहे. या कार्यशाळेच्या निमित्ताने संवाद साधताना घाटीतील डॉक्टरांनी एक दिवसाआड लैंगिक अत्याचार, कौटुुंबिक हिंसाचाराने पीडित महिला-मुली उपचारांसाठी दाखल होतात. यातील प्रत्येक प्रक रणाच्या प्रमाणाची आकडेवारी कार्यशाळेनंतर दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
गरोदर महिलांना विचारणा
घाटीत गरोदर महिला नियमित तपासणीसाठी येतात. अशावेळी तपासणी, उपचारांबरोबर महिलांना विश्वासात घेऊन एखादा अत्याचाराचा प्रकार होता का, याची डॉक्टरांकडून विचारणा केली जाते. त्यातूनही अनेक प्रकरणे समोर येतात.
घाटीत वेगवेगळी प्रकरणे
बलात्कार, शारीरिक छळासह लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचारासंदर्भात वेगवेगळी प्रकरणे येतात. घाटीत दर एक दिवसाआड लैंगिक अत्याचार, कौटुुंबिक हिंसाचाराने एक पीडिता उपचारासाठी दाखल होते. अनेक जणी तर पुढे येतही नाहीत; परंतु अत्याचार सहन न करता पुढे आले पाहिजे. विभागातर्फे १०० पीडितांसंदर्भात अभ्यासही केला आहे. या अभ्यासाचा निष्कर्ष लवकरच काढण्यात येणार आहे.
- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग, घाटी
सन्मानपूर्वक वागणूक
घरगुती हिंसाचार, लैंगिक अत्याचाराने पीडितांना उपचारादरम्यान सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. त्यांच्यावरील उपचार लवकर व्हावेत, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता होणे आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी मदत होणे यादृष्टीने ‘डब्ल्यूएचओ’ मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यासंदर्भात कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे घाटीत लागू केली जातील.
- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय