पशुगणनेत धक्कादायक आकडेवारी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख पशुधनाची घट !
By विजय सरवदे | Updated: March 11, 2025 15:15 IST2025-03-11T15:15:16+5:302025-03-11T15:15:55+5:30
२१ व्या पशुगणनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक मोजणी

पशुगणनेत धक्कादायक आकडेवारी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख पशुधनाची घट !
छत्रपती संभाजीनगर : २५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २१ व्या पशुगणनेस शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रत्यक्षात ही गणना फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, देशभरातच पशुगणनेमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक पशुगणना झाली असून, २० व्या पशुगणनेच्या तुलनेत यावेळी तब्बल दोन लाख पशुधनाची घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
सन २०१९ मध्ये २० व्या पशुगणनेमध्ये पहिल्यांदाच पशूंची प्रजाती, ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात झाली. २० व्या पशुगणनेच्या अहवालानुसार जिल्ह्यात ११ लाख ४८ हजार २८३ पशुधन होते. आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक पशुगणनेचे काम पूर्ण झाले असून, त्यात ७ लाख ९६ हजार ३१२ पशुधनाची नोंद झाली आहे. अर्थात मागील पशुगणनेच्या तुलनेत सुमारे दोन लाख पशुधन कमी झाल्याची बाब समोर आली आहे.
या पशुगणनेत गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आणि महापालिका, नगरपंचायती, नगरपालिकांचे वार्डांत प्रगणकामार्फत ‘ॲप’द्वारे नोंदी घेतल्या जात आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १३६५ गावे आणि २४४ वार्डांचा समावेश असून, ७ लाख ६१ हजार ३१२ कुटुंबांच्या घरी जाऊन नोंदी घेण्यात आल्या आहेत. मार्च अखेरपर्यंत पशुगणना पूर्ण होऊन निश्चित आकडेवारी समोर येईल.
पशुधन घट होण्याची कारणे
यासंदर्भात सूत्रांनी सांगितल्यानुसार प्रामुख्याने गोवंश जनावरांची संख्या वाढली आहे, तर म्हैैसवर्गांमध्ये मोठी घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. असेही सांगितले जात आहे की, शासनाने गोवंश हत्येवर बंदी आणल्यामुळे म्हैसवर्ग जनावरांचा कत्तलीसाठी जास्त वापर होत असावा. दुसरे असे की, अलीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक शहराकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे पशुपालकांची संख्या घटत चालली आहे.
सोळा प्रकारच्या प्राण्यांची मोजणी
यावेळी पाळलेले गाेवंश, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती, याक तसेच कुक्कुट पक्षी जसे की कोंबड्या, बदक, टर्की, इमू, क्वेल, गिनी, शहामृग, अशा सोळा प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, भटक्या गाई आणि भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांचीही माहिती गोळा करण्यात येत आहे.