धक्कादायक ! पोलीस उपायुक्तांच्या केबिनमध्ये तक्रारदार महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 07:57 PM2020-03-16T19:57:13+5:302020-03-16T20:00:44+5:30
आरोपींना वाळूज पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप करून तक्रारदार महिलेने पोलीस उपायुक्तांसमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला
औरंगाबाद : धूलिवंदनाच्या दिवशी (दि.१०) मारहाण करून विनयभंग करणाऱ्या आरोपींना वाळूज पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप करून तक्रारदार महिलेने पोलीस उपायुक्तांसमोर विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.१६) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी महिलेला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.
दहेगाव येथील रहिवासी आरोपी ज्ञानेश्वर राऊत याने दि.१० मार्च रोजी सायंकाळी तक्रारदार महिलेच्या घरासमोर विनाकारण शिवीगाळ करून तिच्या तोंडात मारले. यावेळी पीडिता त्याला समजावत असतानाच तेथे आरोपी किरण राऊत, सावता राऊत आणि विक्रम राऊत हे आले. त्या सर्वांनी महिलेसह तिचे पती, दीर आणि जाऊ यांना घरात घुसून रॉड आणि लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी विक्रमने पीडितेचा ब्लाऊज फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. नंतर आरोपी जिवे मारण्याची धमकी देऊन पळून गेले. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विनयभंग करणे, मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या कलमानुसार गुन्हा नोंद झाला होता.
गुन्हा दाखल होऊन आज ६ दिवस उलटले तरी पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. एवढेच नव्हे तर आरोपी विक्रम राऊत याने पीडितेला गाठून पुन्हा धमकी दिली होती. आरोपींकडून आपल्या कुटुंबाचे बरे वाईट होण्याची शक्यता असल्याने त्यांना तात्काळ अटक करावी, अशी विनंती तक्रारदारांनी वाळूज पोलिसांना केली होती. मात्र वारंवार विनंती करूनही पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदार महिला, तिचा दीर आणि जावेसह दि.१६ मार्च रोजी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन घेऊन आले. पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले.
हे निवेदन उपायुक्त वाचत असतानाच पीडितेने स्वत:जवळील विषारी द्रव्याची बाटली काढली आणि तोंडाला लावली. ती विष पीत असल्याचे तिच्या शेजारी बसलेल्या नातेवाईक आणि पोलिसांच्या लक्षात येताच तिच्या हातातील विषाची बाटली हिसकावण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपायुक्तांसह तिचे नातेवाईकही क्षणभर स्तब्ध झाले. यानंतर पीडितेला पोलिसांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महिला आयुक्तालयात गेल्याचे कळताच आरोपींना अटक
दरम्यान, वाळूज पोलिसांनी आरोपी विक्रम राऊत, ज्ञानेश्वर राऊत, किरण राऊत आणि सावता राऊत यांना १६ मार्च रोजी पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली. आरोपी विक्रम राऊत हा माजी उपसरपंच असून, गावातील राजकीय वादातून हे भांडण झाले होते, अशी चर्चा आहे.