धक्कादायक! परीक्षेच्या एक दिवस अगोदर बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By राम शिनगारे | Published: February 20, 2023 09:53 PM2023-02-20T21:53:34+5:302023-02-20T21:53:55+5:30
परीक्षेचा तणाव : एन ८, सिडको येथील घटना, सिडको पोलिस ठाण्यात नोंद
औरंगाबाद : आवघ्या २४ तासावर बारावीची परीक्षा आलेली असताना एका विद्यार्थ्यांने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही एन ८, सिडको भागातील गुरुनगर हौसिंग सोसायटीमध्ये सोमवारी दुपारी १ वाजता उघडकीस आली. विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातूनच आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांसह नातेवाईकांनी वर्तविला आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
अमन रविंद्र आहेरेवाल (१८, रा. प्लॉट नंबर १८, एन ८, एफ ४, गुरुनगर हौसिंग सोसायटी, सिडको) असे मृत बारावीच्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमन हा कुलभूषण गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयात १२ च्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडिल एका खाजगी कंपनीत नोकरीला असून, एक भाऊ पुण्यात नोकरी करतो. अमन हा रविवारी सायंकाळी जेवण केल्यानंतर त्याच्या तिसऱ्या मजल्यावरील अभ्यासाच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. तो सोमवारी सकाळी खाली आलाच नाही. त्याच्या खोलीत सर्व सुविधा असल्यामुळे तो एक दिवसावर परीक्षा आल्यामुळे अभ्यास करीत असेल म्हणून कुटुंबातील सदस्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
अमनच्या आईचे वडिल उपचारासाठी आलेले होते. दुपारी जेवणासाठी ते अमनला बोलावण्यासाठी त्याच्या खोलीत गेले असता अमन फासावर लटकलेला दिसला. अमन याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. त्यास नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत दुपारी दोन वाजता घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सहायक फौजदार प्रकाश शिंदे करीत आहेत. दरम्यान, अमनच्या खोलीत कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडली नसल्याची माहिती निरीक्षक पवार यांनी दिली.