धक्कादायक ! पाच महिन्यांपासून पगार नसल्याने मेंदूवर ताण येऊन शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:29 PM2019-10-15T17:29:56+5:302019-10-15T17:32:47+5:30
परभणी जि.प.ने पगार विवरणपत्रच दिले नाही
औरंगाबाद : परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून लातूर येथे आंतरजिल्हा बदली झालेल्या नामदेव तुकाराम बोयने (४८) या शिक्षकाचा मेंदूवर आलेल्या अतिताणामुळे शनिवारी मृत्यू झाला. परभणी जिल्हा परिषदेकडून अखेरच्या महिन्यातील पगार विवरणपत्र न मिळाल्याने गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता.
त्यांच्या नशिबी हा संघर्ष मे २०१८ पासून सुरू झाला. देवणी (जि. लातूर) तालुक्यातील धनेगाव हे त्यांचे मूळ गाव. लातूरला आंतरजिल्हा बदली होऊनही, लातूर जि.प.मध्ये समायोजन न झाल्याने त्यांनी गतवर्षी उपोषण केले होते. यावर्षी मे २०१९ मध्येही त्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर त्यांची बदली लातूर जि.प. मध्ये झाली. मात्र, बदली करताना त्यांना पगार विवरणपत्र दिले नाही. त्यामुळे गेल्या ५ महिन्यांपासून त्यांना पगार मिळत नव्हता. त्यातच गेल्या चार महिन्यांत त्यांच्या पत्नीवर दहा लाखांपेक्षा अधिक रुपये खर्च झाल्याचे शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बोयने गेल्या ३ महिन्यांपासून पाथरीचे गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांच्याकडे खेटे मारत होते. बोयने यांच्यावर ११ लाखांचे कर्ज असल्याने पगार विवरणपत्र दिले नसल्याचे खोगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यांनी यातील एकही पैसा परत केला नसल्याचे ते म्हणाले. कुटुंबियांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला. त्यांच्यावर ४ लाखांचेच कर्ज असून यातील बहुतांश कर्ज फेडल्याचा दावा त्यांनी केला. पगारच नसल्याने कर्ज कसे फेडणार, कमावता माणूस गेल्याने आता जगणार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, चार भाऊ असा परिवार आहे.
सचिवांच्या आदेशाला डावलले
ग्रामविकासचे सचिव असिम गुप्ता यांनी ७ जुलै २०१७ रोजी दिलेल्या आदेशानुसार, आंतरजिल्हा बदलीनंतर कार्यमुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या पगारातून कर्जाचे हप्ते कपात करण्यात येत असतील तर या कपातीच्या वजावटीसह कर्जाची रक्कम दुसऱ्या जिल्हा परिषदेस आदेशात नमूद करून देण्यात यावी व दुसऱ्या जिल्हा परिषदेने त्यास नियुक्ती देताना या गोष्टीचा नियुक्ती आदेशात स्पष्ट उल्लेख करावा असे म्हटले आहे. या प्रकरणात परभणी आणि लातूर जिल्हा परिषदेने या आदेशाचे पालनच केले नाही.
नामदेव बोयने यांच्यावर विविध सोसायट्या आणि बँकांचे ११ लाख रुपये कर्ज होते. त्यामुळेच त्यांचे पगार विवरणपत्र रोखले होते.
- विश्वास खोगरे, गटशिक्षणाधिकारी, पाथरी