आता बोला! मित्रांमध्ये शान मारण्यासाठी विद्यार्थ्याने खरेदी केला गावठी कट्टा
By राम शिनगारे | Published: January 17, 2023 08:35 PM2023-01-17T20:35:21+5:302023-01-17T20:35:41+5:30
सातारा पोलिसांची कारवाई : तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद :मित्र परिवारामध्ये शान मारण्यासाठी एका विद्यार्थ्याने चक्क गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे विकत घेतली. याविषयी सातारा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा मारुन विद्यार्थ्यांस गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह पकडले. त्याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत एकाला अटक केल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
चेतन गणेश झळके (२२, रा. वळदगाव, ता. औरंगाबाद) या विद्यार्थ्यासह अक्षय खंडागळे व पिंटु अशी आरोपींची नावे आहेत. चेतन हा वाळूज परिसरातील एका महाविद्यालयात बीबीएच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेतो. निरीक्षक पोतदार यांना चेतनकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून चेतन यास पकडले. तेव्हा त्याच्याकडे ३० हजार रुपये किंमतीची लोखंडी बनावटीचा सिल्वर कलरचा गावठी कट्टा ज्याची लांबी १७ सेंटीमिटर व रुंदी ५ सेंटीमीटर आढळली. तसेच कट्ट्याच्या मुठीवर प्लास्टिकचे काळ्या रंगाचे दोन जिवंत काडतुसेही सापडली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कामगिरी निरीक्षक प्रशांत पोतदार, सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक देविदास शेवाळे, सर्जेराव सानप, संभाजी गोरे, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, हवालदार सुनील धुळे, सातदिवे, मनोज अकोले, सुनील पवार, दिपक शिंदे, कपील खिलारे, रामेश्वर कवडे, अभय भालेराव, बाबासाहेब मुरमुरे यांच्या पथकाने केली.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
आरोपी चेतन झळके यास अटक केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्यास न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायाधिशांनी त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजुर केली आहे. झळके यास गावठी कट्टा विकणाऱ्या अक्षय खंडागळे व पिंटु या दोघांचा शोध सातारा पोलिस घेत आहेत.