धक्कादायक! औरंगाबादेतील शासकीय रुग्णालय घाटीत चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:55 AM2022-07-19T11:55:53+5:302022-07-19T11:57:19+5:30
ओपीडीमधील अनेक कपाटे तोडलेली आढळून आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : येथील शासकीय रुग्णालय व महाविद्यालय घाटी येथील ओपीडीतच चोरी झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. ओपीडीमधील अनेक कपाटे तोडलेली आढळून आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील नागरिकांसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात घाटी हे वरदान आहे. येथे रोज हजारो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. रोज सकाळी हजारो रुग्ण ओपीडी इमारतीमध्ये नोंदणीकरून तपासणीसाठी विविध वार्डात जातात. आज सकाळी नेहमी प्रमाणे ओपीडी इमारतीमध्ये कामकाज सुरु करण्यात आले. मात्र, यावेळी ओपीडीच्या इमारतीत रुग्ण नोंदणी कक्ष, कॅश काऊंटर, औषधी कक्ष या ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ठिकाणी कपाट तोडलेले आढळून आले आहे. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.
दरम्यान, अजून तरी काही रक्कम चोरीला गेल्याचे समोर आलेले नाही. या सगळ्या प्रकाराने ओपीडीत उशीराने रुग्णसेवा सुरू झाली. अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. काशिनाथ चौधरी यांनीही पाहणी केली.