धक्कादायक ! पाणी काढताना सहा महिला पडल्या विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 08:30 PM2019-06-01T20:30:06+5:302019-06-01T20:31:36+5:30
प्रसंगावधान राखून दोन तरुणांनी वाचविले सर्वांचे प्राण
फुलंब्री (जि. औरंगाबाद) : दुष्काळ आणि पाणीटंचाईशी दोन हात करताना ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. तालुक्यातील पानवाडी येथील विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढताना सहा महिला अचानक विहिरीत पडून जखमी झाल्या. यावेळी गावातील दोन तरुणांनी प्रसंगावधान राखून या महिलांचा जीव वाचविला. या महिलांवर सध्या फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून, गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
महिला विहिरीत पडल्याची माहिती मिळताच गावातील शेख आसेफ शेख मुक्तार हा विहिरीकडे धावला व त्याने विहिरीत उडी मारून महिलांना बाहेर काढण्याचे काम केले. त्याला शेख सुलतान शेख सुलेमान यांनी मदत केली. सर्व महिलांना विहिरीबाहेर काढल्यानंतर शेख कदीर शेख तोलू, शेख गणी शेख सुबान, शेख हनीफ जानू पटेल यांनी मदत करून सर्वांना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.
जखमी महिलांची नावे
सायमा कुर्बान पटेल (१७), नजमा फय्याज पटेल (३२), शमिना युनूस पटेल (४०), सबिया युनूस पटेल (१८), मुन्नाबी युसूफ पटेल (५०), कामारुबी समद पटेल (४०) अशी विहिरीत पडलेल्या महिलांची नावे आहेत.