धक्कादायक ! बनावट महिला उभी करून प्लॉटचे खरेदीखत करण्याचा प्रयत्न; चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 07:12 PM2021-01-01T19:12:03+5:302021-01-01T19:20:52+5:30
crime news : आधारकार्ड बनावट असल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदार अधिकाऱ्याने दस्तनोंदणीस आक्षेप घेतला.
औरंगाबाद : बनावट महिला उभी करून बाळापूर शिवारातील एका भूखंडाचे नोंदणीकृत खरेदीखत करण्यासाठी आलेल्या चौघांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. रजिस्ट्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना आरोपींचा बनाव लक्षात आल्यामुळे त्यांनी याविषयी गुरुवारी सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
शेख मन्सूर शेख अहेमद, अमजद बिस्मिल्ला खान, सय्यद मुकीम, सय्यद बशिरोद्दीन अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या सोबत असलेल्या बनावट महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार या रजिस्ट्री कार्यालयात अधिकारी आहेत. १९ डिसेंबर रोजी त्या कार्यालयात दस्त नोंदणीचे दैनंदिन काम करीत होत्या. त्यावेळी त्यांच्यासमोर छाया चौधरी नावाच्या महिलेच्या मालकीचा असलेला बाळापूर शिवारातील भूखंड नोंदणीकृत खरेदीखत करण्यासाठी (दस्त नोंदणीसाठी) आला होता.
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या चार आरोपींनी छाया म्हणून दुसरीच महिला उभी केल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी छाया म्हणून सादर केलेले आधारकार्ड बनावट असल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदार अधिकाऱ्याने दस्तनोंदणीस आक्षेप घेतला. यामुळे आरोपी तेथून पळून गेले. याप्रकरणी ३० डिसेंबर रोजी महिला अधिकाऱ्याने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फौजदार काशीनाथ महांडुळे यांनी तपास करून आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.