धक्कादायक ! टेस्ट ऐवजी सीटी स्कॅनद्वारे निदान करून कोरोनाचे अनावश्यक उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:26 PM2020-12-10T13:26:46+5:302020-12-10T13:31:37+5:30

corona virus, Aurangabad News एचआरसीटीद्वारे निदान केलेल्या कोविड रुग्णांची आरटीपीसीआर, अँटिजन चाचणी न झाल्याने प्रशासनाला रुग्णाची माहिती मिळत नाही.

Shocking! Unnecessary treatment of corona by diagnosis by CT scan instead of test | धक्कादायक ! टेस्ट ऐवजी सीटी स्कॅनद्वारे निदान करून कोरोनाचे अनावश्यक उपचार

धक्कादायक ! टेस्ट ऐवजी सीटी स्कॅनद्वारे निदान करून कोरोनाचे अनावश्यक उपचार

googlenewsNext
ठळक मुद्देआरटीपीसीआर, अँटिजन टेस्टकडे दुर्लक्ष खाजगी रुग्णालयांतील धक्कादायक प्रकार

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर, अँटिजन टेस्टचा अहवाल सकारात्मक येणे आवश्यक आहे; परंतु काही रुग्णालये सीटी स्कॅनद्वारे हाय रिझोल्युशन कम्प्युटराइज्ड टोमोग्राफी (एचआरसीटी) ही तपासणी कोविड निदानासाठी वापरत आहेत. यातून प्रयोगशाळेतील चाचणीशिवाय रुग्णांना गरज नसताना कोरोनाचे उपचार देण्याचा धक्कादायक प्रकार होत आहे.

एचआरसीटीद्वारे निदान केल्यानंतर संबंधित रुग्णांची प्रयोगशाळेतील चाचणीही करणे गरजेचे आहे; परंतु त्याकडे अनेक रुग्णालये दुर्लक्ष करीत आहेत. बऱ्याच आजारांत कोविडसदृश बाबी एचआरसीटीत दिसतात. त्यातून चुकीचे निदान होऊन रुग्णाला कोरोनाचे औषधोपचार दिलेे जातात. हा प्रकार सार्वजनिक आरोग्य विभागाने गंभीरतेने घेतला आहे. एचआरसीटीद्वारे निदान केलेल्या कोविड रुग्णांची आरटीपीसीआर, अँटिजन चाचणी न झाल्याने प्रशासनाला रुग्णाची माहिती मिळत नाही. त्यामुळे अशा रुग्णांसंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालनही होत नाही. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची माहितीही मिळत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचाही धोका नाकारता येत नाही. त्यामुळे एचआरसीटीद्वारे निदान होणाऱ्या रुग्णांची यापुढे २४ तासांच्या आत आरटीपीसीआरद्वारे कोरोना चाचणी करण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने केली आहे.

स्कोअर १८; पण अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाचा एचआरसीटीचा स्कोअर १८ होता; परंतु आरटीपीसीआरचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यास सारी रुग्ण म्हणून घाटीत हलविण्यात आले. तेथे दोन दिवसांनी केलेल्या चाचणीतही रुग्ण निगेटिव्ह आला. एचआरसीटीचा स्कोअर ५ च्यावर असेल, तर कोरोनाची चाचणी करणे गरजेची असते; परंतु अनेक रुग्णालये तसे न करता सरळ कोरोनाचा उपचार देतात.

सारी रुग्ण म्हणून निदान
एचआरसीटीद्वारे खाजगी रुग्णालयांत निदान केले जाते; परंतु त्यांना सारीचे रुग्ण म्हटले जाते. जोपर्यंत कोरोना चाचणी सकारात्मक येत नाही, तोपर्यंत ते कोरोनाचे रुग्ण ठरत नाही. त्यामुळे रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Shocking! Unnecessary treatment of corona by diagnosis by CT scan instead of test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.