धक्कादायक ! नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 07:18 PM2019-05-28T19:18:59+5:302019-05-28T19:19:25+5:30
नापिकीमुळे शेतीत काहीच उत्पन्न निघत नव्हते. त्यामुळे त्या चिंतेत होत्या.
कायगाव (जि. औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील पखोरा येथील एका शेतकरी महिलेने कर्जाला कंटाळून सोमवारी रात्री बारा वाजता आत्महत्या केली. संगीताबाई काशीनाथ पाठे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. पुरुष शेतकरी आत्महत्यांची संख्या मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढत असतानाच आता महिला शेतकरीही मृत्यूस कवटाळत आहेत. मराठवाड्यात या वर्षातील ही अशी पहिलीच घटना असून यामुळे खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविला. मंडळ अधिकारी सोनवणे यांनी पंचनामा केला. संगीताबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार गणेश काथार, सीमंत वाघमारे पुढील तपास करीत आहेत.
याबाबत पखोरा गावचे माजी सरपंच भाऊसाहेब पदार म्हणाले की, संगीताबार्इंचे आपल्या कुटुंबियांवर मोठे प्रेम होते. शेतीकामासाठी घेतलेले कर्ज आपण फेडू, तुम्ही त्रास करून घेऊ नका, असे सांगून त्या नेहमी पतीला धीर देत. कर्ज फेडण्यासाठी वाटल्यास अर्धा एकर जमीन विकू, असेही त्या म्हणत. मात्र काही तरी मार्ग काढू, जमीन विकणे योग्य नाही, अशी पतीकडून समजूत काढली जायची. मयत संगीताबार्इंचा स्वभाव खूप चांगला होता. त्यांचा घरात आणि घराबाहेर कधीच कुणाबरोबर वाद नसायचा. पण कर्जफेड कशी करायची, यासाठी त्या नेहमी चिंतित असत. संपूर्ण गावाला त्यांच्या या समस्येची माहिती होती, अशी माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पदार यांनी दिली.
दोन एकर शेती
दोन एकर शेतीसाठी संगीताबार्इंनी चार वर्षांपूर्वी महिला बचत गटाकडून सव्वालाखाचे कर्ज घेतले होते. परंतु शेतात उत्पन्न न आल्याने त्या कर्जबाजारीपणाला कंटाळल्या होत्या. बचत गटाच्या महिला आणि ज्या वित्त संस्थेने बचत गटामार्फत कर्ज दिले होते, त्यांचे अधिकारी नेहमी कर्जाचे हप्ते भरावे, यासाठी घरी येऊन तगादा लावत होते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, ही मोठी विवंचना होती. शेती कोरडवाहू असल्याने त्यात मागील पाच वर्षांत काहीच उत्पन्न आले नव्हते. त्यामुळे संगीताबार्इंनी हा मार्ग पत्करला. संगीताबार्इंच्या दोन मुलांपैकी एक सतरा वर्षीय मुलगा दहावीला आणि दुसरा सात वर्षांचा मुलगा इयत्ता दुसरीत शिकतो.
महिला-पुरुष अशी वर्गवारी नाही
शेतकरी आत्महत्येची महिला-पुरूष अशी वर्गवारी केली जात नाही. कायगांव येथील प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. असे महसूल उपायुक्त डॉ.विजयकुमार फड यांनी सांगितले.
३१३ आत्महत्या
मराठवाड्यात १ जानेवारी ते २८ मेपर्यंत ३१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २११ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरले असून, ६७ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ३५ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. १ कोटी ४४ लाख रुपयांची शासकीय मदत करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये ३९, जालना ४५, परभणी २५, हिंगोली १८, नांदेड ३५, बीड ६९, लातूर ३३, उस्मानाबाद ४९ अशा ३१३ आत्महत्या झाल्या आहेत.