तिचे सारथ्य लांबणीवर ! महिलांच्या हाती दिले जाणारे एसटीचे स्टिअरिंग केले 'जाम'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 04:11 PM2020-07-21T16:11:41+5:302020-07-21T16:13:43+5:30
प्रशिक्षणच थांबविले : औरंगाबादेत सुरू होते ३२ महिलांचे प्रशिक्षण
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : एसटी महामंडळात मोठा गाजावाजा करून महिला चालक दाखल होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात आली. प्रशिक्षणही सुरू करण्यात आले. परंतु कोरोनाच्या नावाखाली महिलांच्या हाती दिले जाणारे 'एसटी'चे स्टिअरिंगच 'जाम' करण्यात आले आहे.
औरंगाबादेत सुरू असलेल्या ३२ महिलांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले आहे. औरंगाबाद आणि नाशिक प्रदेशासाठी चालकपदासाठी ३२ महिलांची निवड करण्यात आली. यात औरंगाबाद विभागतील ६ महिलांचा समावेश आहे. ३ फेब्रुवारी २०२० पासून त्यांचे औरंगाबादेत प्रशिक्षणही सुरू करण्यात आले होते. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर या सर्व महिला एसटी चालक म्हणून रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले. एसटी महामंडळाने १७ जुलै रोजी एका पत्राद्वारे सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहायक, लिपिक-टंकलेखक, राज्यसंवर्ग व अधिकारी पदांमध्ये आणि अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचे प्रशिक्षण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याची सूचना विभाग नियंत्रकांना केली. त्यानुसार औरंगाबादेत प्रशिक्षण थंबविण्यात आले आहे. ही केवळ तात्पुरती स्थगिती असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. त्यामुळे एसटी महामंडळात ती’च्या हाती ‘एसटी’चे सारथ्य येणे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या महिला चिंतेत प्रशिक्षण पुन्हा कधी सुरू होईल, याची कोणतीही माहिती दिली जात नाही. काही कालावधीनंतर झालेली निवडच रद्द होण्याची आणि त्यातून एसटीत चालक म्हणून रुजू होण्याच्या स्वप्नांनावर पाणी फेरले जाण्याची भीती निवड झालेल्या महिला उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.
आधी गाजावाजा, आता अन्याय
मोठा गाजावाजा करून महिला चालक नेमण्यात येत असल्याचे सांगितले. परंतु त्यासाठी सुरू असलेले प्रशिक्षणच बंद करण्यात आले. हा एकप्रकारे अन्याय आहे. प्रशिक्षण तात्पुरते स्थगित केल्याचे सांगितले जाते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महिलांनी चालक पदाची वाटचाल सुरू केली. त्यामुळे प्रशिक्षण पुन्हा सुरू करून महिलांना न्याय दिला पाहिजे.
- शिला नाईकवाडे, राज्य महिला संघटक, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना