धक्कादायक ! सिडकोतील हॉटेलमध्ये कामगार आढळला मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:32 AM2020-05-19T08:32:00+5:302020-05-19T08:33:00+5:30
कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही त्याच्या जवळ जाण्यास तयार होत नव्हते.
औरंगाबाद : शहरातील सिडको, एन- ६ येथील
आविष्कार चौकातील एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय कामगार बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने सोमवारी रात्री एकच खळबळ उडाली. या कामगारास १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी मयत घोषित केल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली.
प्रदीप गंगाधर पवार असे या कामगाराचे नाव आहे. आविष्कार चौकातील अशोक गायकवाड यांच्या हॉटेलमध्ये प्रदीप पवार हा कामगार गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेलमध्ये रहात होता. सोमवारी रात्री तो अचानक बेशुद्धावस्थेत आढळून आला. रात्री या भागात फिरणाऱ्या काही लोकांना हॉटेल अर्धवट उघडे दिसले. त्यावेळेस आत प्रदीप पवार हा बेशुध्द पडलेला दिसून आला. याविषयी माहिती मिळताच हॉटेल मालक अशोक गायकवाड हेही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कोणी आत जाण्याचे धाडस करत नव्हते. कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही त्याच्या जवळ जाण्यास तयार होत नव्हते.
याविषयी सिडको पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. याठिकणी पोलिसांनी धाव घेतली. रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास १०८ रुग्णवाहिका याठिकाणी दाखल झाली. यातील डॉक्टरांनी सदर कामगार मयत असल्याचे सांगितले. १०८ रुग्णवाहिकेतून कामगारास घाटीत नेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे रात्री उशिरा याप्रकरणी पुढील कारवाई सुरू होती.
तीन तास मृतदेह पडून
ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळें तीन तास मृतदेह हॉटेलमध्ये पडून होता. पवार हा कोरोनाचा रुग्ण असावा याभितीने पोलिस त्यांच्याजवळ गेले नाही . त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका आणण्यासाठी पोलिसांनी मनपा अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र तीन तास प्रतिक्षा करूनन्ही रुग्णवाहिका आली नव्हती .