धक्कादायक, औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चे ५३ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:05 AM2021-05-29T04:05:16+5:302021-05-29T04:05:16+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’ने आतापर्यंत तब्बल ५३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खाजगी रुग्णालयांकडून ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’ने आतापर्यंत तब्बल ५३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत लपविण्यात आलेली आकडेवारी आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाली आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा १७ वरून थेट अर्धशतक पार झाला. याबरोबरच्या ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णाची संख्याही तब्बल ५७६ असल्याचेही समोर आले आहे. ही दोन्ही आकडेवारी पाहून आरोग्य यंत्रणाही हादरून गेली असून, औरंगाबादला ‘म्युकरमायकोसिस’ने घट्ट विळखा घातल्याची चिंतादायक परिस्थिती आहे.
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडून गेले काही दिवस ‘म्युकरमायकोसिस’ची जी रुग्णसंख्या सांगण्यात येत होती, त्यावरून औरंगाबादेत या नव्या संकटाची फारशी चिंतादायक स्थिती नसल्याचे चित्र होते. परंतु त्याच वेळी दुसरीकडे ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी इंजेक्शन्स अपुरी पडू लागली. रुग्णांच्या नातेवाइकांची आणि खाजगी रुग्णालयांकडून इंजेक्शनची नुसती शोधाशोध सुरू झाली.
कोविडसंदर्भातील शासनाच्या संकेतस्थळावर रुग्णांची ज्या प्रमाणात माहिती नमूद केली जाते, त्या आकडेवारीच्या आधारावरच शासनाकडून आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी शासकीय संकेतस्थळावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती नियमितपणे अपडेट ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांकडून उपचार घेणाऱ्या आणि मृत्यू पावलेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. ही माहिती अपडेट करण्यासाठी औरंगाबादेतील रुग्णालयांकडून आरोग्य यंत्रणेला माहिती देण्यात आली. तेव्हा आलेली आकडेवारी पाहून आरोग्य यंत्रणेचे डोळेच पांढरे झाले.
एकाच दिवसात वाढले मृत्यूचे आकडे
जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची माहिती अपडेट करण्यात येत आहे. त्यांच्याकडे गेले काही दिवस मयत रुग्णांची माहितीची यादीच नव्हती. परंतु अवघ्या एकाच दिवसात खाजगी रुग्णालयात यादी प्राप्त झाली. तेव्हा औरंगाबादेतील आतापर्यंतच्या मयत रुग्णांची संख्या ५३ असल्याचे समोर झाले. या रुग्णांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
एकाच दिवसात १७७ रुग्णांची भर
औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चे ३९९ रुग्ण असल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली होती. ही संख्या शुक्रवारी सायंकाळपर्यंत तब्बल ५७६ वर गेली. अवघ्या एकाच दिवसात तब्बल १७७ रुग्णांची माहिती समोर आली. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
--
रुग्णालयांची यंत्रणेलाच माहिती नव्हती
‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही रुग्णालयांची आरोग्य यंत्रणेलाच माहिती नव्हती. त्यामुळे येथील रुग्णांची माहिती आतापर्यंत समोर आलेली नव्हती. यासंदर्भात अखेर आरोग्य यंत्रणेला माहिती मिळाली आणि त्यांच्याकडील रुग्णांची माहिती घेण्यात आली. ही कोणती रुग्णालये आहेत, हे मात्र समजू शकले नाही.
--
मनपाअंतर्गत रुग्णालये
‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची माहिती अपलोड करण्यात येत आहे. आतापर्यंत ५३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर रुग्णसंख्या ५७६ झाली आहे. अनेक खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत माहिती मिळालेली नव्हती. त्यांच्याकडून आता माहिती मिळाली आहे. ही रुग्णालये महापालिकेच्या अंतर्गत आहेत.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक