छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध

By बापू सोळुंके | Published: September 2, 2023 04:21 PM2023-09-02T16:21:30+5:302023-09-02T16:23:48+5:30

जालना पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी

Sholay style agitation on Jalakumbha in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध

छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश देणाऱ्या जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना तात्काळ निलंबित करावे, यामागणीसाठी शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शनिवारी दुपारी अचानक पुंडलिकनगर येथील जलकुंभावर चढून शाेले स्टाईल आंदोलन केले. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आंदोलकांशी फोनवर संवाद साधून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने उपोषण करणाऱ्या मराठा समाज बांधवावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केल्याची घटना जालना जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहे. शुक्रवारी रात्री शहरात दोन ठिकाणी आंदोलन झाल्यांनतर शनिवारी सकाळपासून शहरात मराठा समाज या घटनेच्याविरोधात एकवटला. 

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील कोटकर, रमेश गायकवाड, अशोक मोरे, गजानन पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, गणपत म्हस्के, मनोज पवार आदी कार्यकर्ते शनिवारी दुपारी पुंडलिकनगर येथील जलकुंभावर चढले. ही माहिती कळताच पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहायक पेालीस आयुक्त रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक राजश्री आडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी पवार आदींसह अन्य अधिकारी,कर्मचारी तेथे फायर ब्रिगेडच्या वाहनासह दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना खाली येण्याचे आवाहन केले. मात्र ते ऐकत नव्हते. जालन्याचे पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी आंदोलक करीत होते. 

यावेळी तेथे आलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अभिजीत देशमुख यांना पोलिसांनी मध्यस्थी करण्याची विनंती केली. तेव्हा देशमुख हे जलकुंभावर चढले.यावेळी त्यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. तेव्हा जालन्यातील त्या दोषी अधिकाऱ्यांची  चाैकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई होणारच असल्याचे आश्वासन भुमरे यांनी दिल्याने आंदोलकांचे समाधान झाले. यानंतर ते जलकुंभावरून खाली आले.

रस्त्यावर ठिय्या
जलकुंभावर मराठा आंदोलक चढल्याचे कळताच तेथे दाखल झालेल्या मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केला. जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, लाख मराठा, राज्य सरकारचा निषेध असो,आदी घोषणा देत होते. यामुळे पोलिसांनी पुंडलिकनगर रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवला होता.

Web Title: Sholay style agitation on Jalakumbha in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.