चॉकलेट-बिस्कीटचे आमिष देऊन शाळकरी मुलींवर दुकानदाराचा अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:17 PM2020-02-18T15:17:22+5:302020-02-18T15:18:56+5:30
आरोपीला चिकलठाणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
औरंगाबाद : शहरालगतच्या एका गाव शिवारातील रहिवासी ८ आणि ११ वर्षीय शाळकरी मुलींना चॉकलेट, बिस्किट आणि सॉक्स देण्याचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. १७) दुपारी समोर आली. माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या.
बाबूराव चौधरी बाबा (६०) असे आरोपीचे नाव आहे. शहरालगतच्या एका गावातील ८ वर्षीय पीडितेचे वडील सालगडी आहेत. त्यांच्या शेजारीच पीडितेची ११ वर्षीय मैत्रीण, मजूर आई-वडिलांसह राहते. दोघी जवळच्या जिल्हा परिषदेत शाळेत अनुक्रमे तिसरी आणि पाचवीमध्ये आहेत. ८ वर्षीय पीडितेचे वडील दोन्ही मुलींना शाळेत नेऊन सोडतात व शक्य असेल, तर ते त्यांना शाळेतून आणण्यासाठीही जातात. त्यांना काम असते तेव्हा दोघी पायी शाळेत जातात व येतात. शाळेजवळच आरोपी चौधरीचे किराणा दुकान आहे. या दुकानात शाळेतील अनेक मुले, मुली चॉकलेटसह, अन्य वस्तू घेण्यासाठी जातात. आरोपीची दोन्ही मुलींवर वाईट नजर पडली होती. शनिवारी दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर दोघी शाळेतून घरी निघाल्या तेव्हा चौधरीने आवाज देऊन त्यांना बोलावून घेतले. चॉकलेट, बिस्कीट दिले. यानंतर तो त्यांच्या अंगावरील कपडे काढू लागला. घाबरलेल्या दोन्ही मुली रडू लागल्या. तेव्हा त्याने त्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत शांत केले. त्याने दोघींवर अत्याचार केला. या आघातामुळे प्रचंड घाबरलेल्या पीडिता घरी गेल्या. मात्र, याविषयी त्यांनी आई-वडिलांकडे वाच्यता केली नाही.
...अन् दोघीही रडू लागल्या
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आई-वडिलांनी ८ वर्षीय मुलीला शाळेत जाण्यासाठी तयार केले. नेहमीप्रमाणे ती पाठीवर दप्तर घेऊन तिच्या ११ वर्षीय मैत्रिणीच्या घरी गेली. तेव्हा दोघीही मैत्रिणी रडू लागल्या आणि शाळेत जायचे नाही, असे म्हणू लागल्या. यामुळे मोठ्या मुलीच्या आईने त्यांना विश्वासात घेऊन विचारल्यानंतर त्यांनी नराधम दुकानदार चौधरीबाबाच्या कृत्याची माहिती दिली. एवढेच नव्हे तर त्याने यापूर्वीही शेतात आणि त्याच्या घरात असे कृत्य केल्याचे सांगितले.
चाईल्ड लाईनच्या मदतीने गाठले ठाणे
दोघींना घेऊन त्यांचे पालक शाळेत गेले. शाळा प्रशासन, शिक्षिकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चाईल्ड लाईनच्या मदतीने चिकलठाणा पोलीस ठाणे गाठले. सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि कर्मचाऱ्यांनी झटपट कारवाई करीत नराधम आरोपी बाबूराव चौधरीला बेड्या ठोकल्या.