सर्विस रोडवर अतिक्रमण केलेल्या दुकानमालकांची लाखोंची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 07:51 PM2019-03-13T19:51:12+5:302019-03-13T19:53:35+5:30
दहा हजार भाडे, पाच लाख अॅडव्हान्स
औरंगाबाद : बीड बायपास रोडवर निष्पाप नागरिकांचे दररोज रक्त सांडत असताना काही नागरिकांनी सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून ठेवली आहेत. काही नागरिकांनी सर्व्हिस रोडवर पक्की दुकाने दहा ते बारा वर्षांपूर्वी बांधली होती. एका दुकानदाराकडून दहा हजार रुपये दरमहा भाडे आणि पाच लाख रुपये अॅडव्हान्सही घेण्यात येत होते. मागील काही वर्षांमध्ये दुकानमालकांनी लाखो रुपयांची कमाई केल्याचे देवळाई चौकातील काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
देवळाई चौकात एकाच व्यक्तीची असंख्य दुकाने होती. ही दुकाने वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर दिली होती. चप्पल, हार्डवेअर, मोबाईल शॉपी, प्लायवूड, कार्पेट विक्रेता आदींना ही दुकाने दिली होती. अनेक भाडेकरून आठ ते दहा वर्षांपासून या चौकात व्यवसाय करीत होते. अचानक दुकान तोडण्यात आल्याचे दु:ख व्यापाऱ्यांना अजिबात नव्हते. कारण दुकान आमच्या मालकीची नसून आम्ही तर भाडेकरू आहोत, असे अनेकांनी सांगितले. आमच्या सामानाचे नुकसान टाळण्यासाठी काही वेळ द्या, दुकान रिकामे करून देऊ, अशी विनंती व्यापाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे केली. मनपा कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांंना दुकानांचे शटर काढून घ्या, कशाला नुकसान करून घेता, असे सांगितले. भाडेकरू दुकानदार म्हणाला, दुकानमालकाकडे एवढी गडगंज संपत्ती आहे की, असे शंभर शटर तुटले तरी काही किंचितही फरक पडणार नाही. ज्या व्यापाऱ्यांनी तातडीने मंगळवारी दुकाने रिकामी केली त्यांनी आता पर्यायी आणि पक्की दुकाने शोधण्याचे काम सुरू केले. सहजासहजी पर्यायी जागा त्यांना मिळणार नाही.
मोबदला कशासाठी द्यावा...
सर्व्हिस रोडच्या शासकीय जागेवर अगोदरच नागरिकांनी अतिक्रमणे करून अनेक दुकाने थाटली आहेत. आता जागा रिकामी करून देण्याचा मुद्दा आल्यावर जागेचा मोबदलाही अनेक जण मागत आहेत. ज्या अतिक्रमित जागेवर फुकट बसून लाखो रुपये भाडेपट्टा वसूल केला त्यांना मावेजा कोठून देणार, असा प्रश्नही मनपा अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
साईड पंखे कोणी भरावेत
बीड बायपास रोड सध्या ६० फूट रुंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने किमान ५ फूट कच्चा रस्ता आहे. डांबरी रस्त्यावरून दुचाकी कच्च्या रस्त्यावर आणताना अनेकदा अपघात होत आहेत. कच्च्या रस्त्यामधील साईड पंखे नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरी पद्धतीने भरले तर अपघाताच्या प्रमाणात घट होईल, असा अंदाज मनपा अधिकाऱ्यांनी वर्तविला.