दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:15 AM2017-10-11T00:15:40+5:302017-10-11T00:15:40+5:30
कर्मचा-यांच्या खात्यात पगार जमा झाल्याने तो पैसा बाजारात येऊ लागला आहे. मंगळवारी किराणापासून कपड्यांपर्यंत खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अवघ्या आठवडाभरावर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. कर्मचा-यांच्या खात्यात पगार जमा झाल्याने तो पैसा बाजारात येऊ लागला आहे. मंगळवारी किराणापासून कपड्यांपर्यंत खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग दिसून आली. ग्राहकांनी दुकानात पाऊल ठेवल्यामुळे व्यापा-यांमध्येही आता समाधानाचे वातावरण पसरले आहे.
दिव्यांचा, मांगल्याचा, स्नेहाचा सण म्हणजे दिवाळी... वर्षभरातील सर्व सण एकीकडे आणि दिवाळीचा सण एकीकडे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, बाजारपेठेत वर्षभरात होणा-या एकूण उलाढालीपैकी ४० टक्के उलाढाल दिवाळीत होत असते; मात्र नोटाबंदी व त्यानंतर जीएसटी लागू झाल्यामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली होती.
यामुळे उलाढालीचा आलेख एकदम खाली आला होता. दसºयाला अपेक्षित उलाढाल झाली नाही. यामुळे व्यापारी वर्गात दिवाळीविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते; पण पगार हातात आल्याने मंगळवारी बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली. किराणापासून कपड्यापर्यंत खरेदी करताना ग्राहक दिसून आले. ग्राहकांच्या स्वागतासाठी महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच बाजारपेठ सजली आहे. आकाश कंदिल, पणत्या, विद्युत रोषणाई, सुगंधी उटणे, सुगंधी साबणापासून विविध गृहोपयोगी वस्तू दुकानात आकर्षकरीत्या मांडण्यात आल्या आहेत.
मागील दोन दिवस रिमझिम पावसामुळे ग्राहकीवर परिणाम झाला होता; पण आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते; पण पाऊस न आल्याने ग्राहकांनी खरेदी सुरू केली. जुन्या शहरातील बाजारपेठ, तसेच टीव्ही सेंटर, सिडको कॅनॉट प्लेस, जालना रोड, पुंडलिकनगर, गारखेडा परिसर, त्रिमूर्ती चौक, उल्कानगरी, काल्डा कॉर्नर परिसर, उस्मानपुरा अशा शहरातील चोहोबाजूने असलेल्या बाजारपेठेत दिवाळीची खरेदी करताना ग्राहक दिसून येत होते. यंदा जिल्हा परिषद मैदानावर फटाका बाजाराला परवानगी दिली नाही. यामुळे या परिसरातील वर्दळ कमी दिसून आली. येत्या दोन दिवसांत कामगार व कर्मचाºयांच्या हातात बोनसही पडेल, यामुळे शेवटच्या टप्प्यात बाजारपेठेत मोठी उलाढाल होईल, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी दिली.
स्वदेशी आकाश कंदिल खरेदीवर भर
दिवाळीनिमित्त शहरात लहान-मोठी ८० पेक्षा अधिक आकाश कंदिलची दुकाने थाटली आहेत. यंदा बाजारात ९८ टक्के आकाश कंदिल स्वदेशी बनावटीचे आले आहेत. बहुतांश आकाश कंदिल मुंबईहून आणण्यात आले आहेत. यंदा चांदणीच्या आकारातील आकाश कंदिलामध्ये विविधता पाहण्यास मिळत आहे.
याशिवाय मोदक, अनारकली, अष्टकोनी, चंद्रमुखी, युओफो, कमळ, स्वस्तिक, पेशवाई दीप, राजवाडी असे असंख्य आकाश कंदिल विक्रीसाठी आले आहेत, तसेच लेसचे आकाश कंदिलही नावीन्यपूर्ण ठरत आहे. याशिवाय मेटलचे दिवेही यंदाचे आकर्षण ठरत आहे. मेटलच्या दिव्यांमध्ये पणती किंवा बल्ब लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या दिव्यांचा वापर दिवाळीनंतर शोभेची वस्तू म्हणूनही करण्यात येऊ शकतो. शहरात सुमारे अडीच लाख आकाश कंदिल दरवर्षी विक्री होतात, अशी माहिती होलसेल विक्रेता तेजपाल जैन यांनी दिली.