लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडी, नागरिकांचा विनामास्क संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:05 AM2021-05-21T04:05:32+5:302021-05-21T04:05:32+5:30
औरंगाबाद : जुन्या शहरात कोरोना नियमांचे पालन केले जात नाही, दुकाने उघडी आणि नागरिकांचा विनामास्क संचार सुरू असल्याच्या तक्रारी ...
औरंगाबाद : जुन्या शहरात कोरोना नियमांचे पालन केले जात नाही, दुकाने उघडी आणि नागरिकांचा विनामास्क संचार सुरू असल्याच्या तक्रारी आल्यामुळे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी काही भागांची पाहणी केली. विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश देत पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांना त्यांनी समज दिली.
पांडेय यांनी बुढीलेन, सिटी चौक, मंजूरपुरा, शहागंज, चंपाचौक, चेलीपुरा, लोटाकारंजा या भागाची पाहणी केली. बहुतेक ठिकाणी नागरिक विनामास्क फिरत असल्याचे त्यांना दिसून आले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजल्यानंतरही सुरूच असल्याचे दिसल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे आदेश त्यांनी दिले.
लॉकडाऊनच्या काळात जुन्या शहरात अनेक नागरिक, तरुण मास्क घालत नाहीत. दुकाने दिवसभर उघडी असतात अशा तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे पांडेय यांनी काही भागांना भेट देऊन नागरिक, दुकानदारांना समजावले. बुढीलेन भागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून आले. सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांना प्रशासकांनी समज देत कचरा उचलण्याचे आदेश दिले. पालिकेचे शहर अभियंता एस. डी. पानझडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यावेळी त्यांच्या सोबत होते.
काही क्षणांत चहाची टपरी हटविली
पालिका मुख्यालयाच्या गेटसमोरील झाडाखाली चहा टपरी दिवसभर सुरू असते. पाहणीअंती या टपरी चालकावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर काही क्षणांत ही टपरी हटविण्यात आली.
पोलिसांचीही कानउघाडणी
संचारबंदीमुळे चेलीपुरा पोलीस चौकीच्या शेजारी पोलिसांचा एक पॉइंट लावलेला आहे. तेथे २४ तास पोलिसांचा पहारा असतो. त्या पॉईंटवरील पोलिसांना पांडेय म्हणाले, तुमच्या समोर नागरिक विनामास्क फिरत असून, दुकानेदेखील सुरू आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, असे सांगत त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांची कानउघाडणी केली.