तुकडीवाढ समित्यांमध्ये सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:42 PM2019-03-18T23:42:07+5:302019-03-18T23:42:29+5:30
विद्यापीठातर्फे महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात तुकडीवाढ देण्याच्या संदर्भात समित्या पाठविण्यात येत आहेत. या समित्यांच्या टी.ए.,डी.ए.पोटी हजारो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला.
औरंगाबाद : विद्यापीठातर्फे महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात तुकडीवाढ देण्याच्या संदर्भात समित्या पाठविण्यात येत आहेत. या समित्यांच्या टी.ए.,डी.ए.पोटी हजारो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनातर्फे महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० वर्षाच्या विस्तारीकरणांतर्गत होणाऱ्या तुकडी वाढीच्या अनुषंगाने समित्या पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका महाविद्यालयातील विविध शाखांच्या प्रत्येक तुकडीसाठी चार सदस्यांची स्वतंत्र समिती पाठविण्यात येत आहे. या समितीमध्ये प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश असून, या चौघांच्या डी.ए.सह प्रवास भत्त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात येत आहेत. एका महाविद्यालयात एकच समिती गेली पाहिजे. या समित्या पाठविताना सर्व घटकातील प्राध्यापकांचा विचार केला पाहिजे. मात्र, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर हे दबावात काम करत असून, विशिष्ट गटाच्या, जातीच्या प्राध्यापकांनाच समित्यांवर पाठवत असल्याचा आरोपही व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याविषयी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना दिलेल्या निवेदनावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, बामुक्टोचे सचिव डॉ. विक्रम खिलारे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. हंसराज जाधव आदींनी स्वाक्षऱ्या आहेत. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
चौकट,
बामुक्टो, बामुक्टा आंदोलन करणार
विस्तारीकरणांतर्गत समित्यांमध्ये विशिष्ट महाविद्यालयातील प्राध्यापकांचा भरणा करणे, सेवाज्येष्ठतेचा विचार न करणे अशी बेकायदेशीर प्रक्रिया होत आहे़ या प्रक्रियेतील सावळा गोंधळ आणि दोषींवर कारवाईसाठी बामुक्टो, बामुक्टा आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.