'अल्पावधीत तुम्ही श्रीमंत व्हाल'; कमिशनच्या नावाखाली ५ लाखाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 07:50 PM2020-08-14T19:50:11+5:302020-08-14T19:51:06+5:30

क्यू नेट कंपनी, विहान सेलिंग कंपनी संचालकांवर गुन्हा 

'In a short time you will be rich'; 5 lakh gangster in the name of commission | 'अल्पावधीत तुम्ही श्रीमंत व्हाल'; कमिशनच्या नावाखाली ५ लाखाला गंडा

'अल्पावधीत तुम्ही श्रीमंत व्हाल'; कमिशनच्या नावाखाली ५ लाखाला गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देविक्री करूनही आरोपींनी त्यांना कमिशन आणि अन्य परतावा दिला नाही.

औरंगाबाद : साखळी पद्धतीने  (एमएलएम) वस्तूंची विक्री करा आणि भरपूर कमिशन आणि बोनस  मिळवा, असे आमिष दाखवून शहरातील काही जणांची क्यू नेट प्रा. लि. तथा  विहान डायरेक्ट सेलिंग कंपनीने ४ लाख ९७ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने  कंपनी संचालक आणि एजंट अशा १० जणांवर बुधवारी रात्री वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

एजंट ज्ञानेश्वर ऊर्फ अंकुश रिंडे (रा. बालाजीनगर), रोहित देशपांडे, अजिंक्य कवटेकर, अक्षय कुलकर्णी, सागर लाहूळकर, गिरीश कुलकर्णी, धनंजय देशपांडे, रामेश्वर झिने आणि विशाल समिंद्रे अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे यांनी सांगितले की, आरोपींनी २०१६ मध्ये क्रांतीचौकातील हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करून तक्रारदार कल्याण झिंगराव इंगळे आणि त्यांच्या नातेवाईकांना कंपनीच्या वस्तू खरेदी करून साखळी पद्धतीने  विक्री केल्यावर प्रत्येक व्यक्तीमागे  आकर्षक कमिशन आणि हमखास रॉयल्टी परतावा मिळेल. कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास  अल्पावधीत तुम्ही श्रीमंत व्हाल, असे आमिष त्यांनी दाखवले. हे ऐकून त्यांनी २ ते १० लाखांच्या वस्तू विक्री केल्या. 

आरोपींच्या आमिषाला बळी पडून तक्रारदार कल्याण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तब्बल ४ लाख ९७ हजारांच्या वस्तू खरेदी केल्या. मात्र, ठरल्याप्रमाणे आरोपींनी त्यांना कमिशन आणि अन्य परतावा दिला नाही. यामुळे त्यांनी कंपनीच्या एजंटासह अन्य आरोपींकडे पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी पैसे परत न करता उडवाउडवीची उत्तरे  दिली.  आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच कल्याण यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार अर्ज नोंदविला. यासह अन्य काही लोक अशाच प्रकारची तक्रार घेऊन पोलिसांना भेटले. आयुक्तांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठविले.  पोलीस निरीक्षक सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, कर्मचारी योगेश तळवंदे, फिरोज खान यांनी अर्जाची चौकशी करून  १२ आॅगस्ट रोजी रात्री आरोपींविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. 

यांचीही झाली फसवणूक
कल्याण इंगळे यांच्याप्रमाणेच शिवकुमार प्रकाश पवार, सुमित हिरालाल बडे आणि शांतीनाथ भाऊसाहेब ढाकणे यांनाही आरोपींनी गंडविल्याचे समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिनगारे यांनी दिली. 

Web Title: 'In a short time you will be rich'; 5 lakh gangster in the name of commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.