महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:04 AM2021-03-23T04:04:37+5:302021-03-23T04:04:37+5:30
कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्या चिकलठाणा एमआयडीसीत ३०० खाटांचे मेल्ट्रॉन हॉस्पिटल चालविले जात आहे. गतवर्षी राज्य सरकारने एमआयडीसीच्या माध्यमातून हे सुसज्ज ...
कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्या चिकलठाणा एमआयडीसीत ३०० खाटांचे मेल्ट्रॉन हॉस्पिटल चालविले जात आहे. गतवर्षी राज्य सरकारने एमआयडीसीच्या माध्यमातून हे सुसज्ज हॉस्पिटल उभारून महापालिकेकडे हस्तांतरित केले होते. ऑक्सिजन बेड्सची सुविधा असल्याने या ठिकाणी बहुसंख्य गंभीर रुग्णच दाखल होत आहेत. गंभीर रुग्णांना त्यातही न्यूमोनिया झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर तसेच रक्त पातळ करण्यासाठी इनॉक्सापॅरीन हे इंजेक्शन द्यावे लागते. मात्र, मनपाकडील या इंजेक्शन्सचा साठा कधीच संपला आहे. त्यामुळे मनपाच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमधील रुग्णांना हे इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले जात आहे. हे इंजेक्शन महागडे असल्याने रुग्णांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. हॉस्पिटलशेजारच्या मेडिकलवरूनच औषधे आणावीत, असा आग्रह कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
विशेष बाब म्हणजे, या मेडिकलचे व्हिजिटिंग कार्डही नातेवाईकांना चिठ्ठीसोबत देण्यात येत आहे. दुसऱ्या औषध दुकानातून आणलेली औषधे स्वीकारली जात नाहीत, हे विशेष! दरम्यान, यासंदर्भात महापालिकेचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी सांगितले की, रेमडेसिवीर आणि इनॉक्सापॅरीन इंजेक्शन्सची मागणी शासनाकडे नोंदविलेली आहे. लवकरच या इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध होईल.
हॉस्पिटलमध्ये ३०० रुग्ण दाखल
मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये सध्या ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी १२० ऑक्सिजन बेड्स आहेत. यातील अनेक रुग्णांना दररोजच ही इंजेक्शन्स लागत आहेत. मात्र, मनपाकडे त्यांचा साठा नसल्याने ती बाहेरून खरेदी करून आणावी लागत आहेत. तोपर्यंत रुग्णांना तसेच ठेवता येत नाही. त्यामुळे परिस्थितीनुसार रुग्णांना बाहेरून इंजेक्शन्स मागवायला सांगितले जाते.
- डॉ. बी. डी. राठोडकर, मनपा