युनानी रुग्णालयात औषधींचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:04 AM2021-03-31T04:04:26+5:302021-03-31T04:04:26+5:30
लासूरगाव : जिल्हा परिषदेंतर्गत वैजापूर तालुक्यात पाच ठिकाणी युनानी दवाखाने कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र, या रुग्णालयात औषधांचा तुटवडा ...
लासूरगाव : जिल्हा परिषदेंतर्गत वैजापूर तालुक्यात पाच ठिकाणी युनानी दवाखाने कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र, या रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना रिकाम्या हातीच परतावे लागत आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात पाच युनानी व पाच आयुर्वेदिक रुग्णालये सुरू करण्यात आली. वैजापूर (लासूरगाव), सोयगाव (गोंदेगाव),
कन्नड (चिकलठाणा), औरंगाबाद (पिंपरी राजा), औरंगाबाद शहर (शहा बाजार) येथील रुग्णालयाचा समावेश आहे. तर आयुर्वेदिक दवाखानामध्ये पोखरी-
भगूर, सावखेडा, घाटनांद्रा, औरंगाबाद या गावांचा समावेश होतो. लासूरगाव येथील युनानी दवाखान्यात रोज ५० ते ६० रुग्णांचा उपचार दिला जातो; परंतु या रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना औषधीविनाच रिकाम्या हाती परतावे लागत आहे.
रुग्णालयात औषधीच उपलब्ध नसल्याने गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. युनानी औषधांमुळे अनेक जुनाट रोग समूळ नष्ट होत असल्याचे सांगितले जाते. यात मधुमेह, मूतखडा, मूळव्याध यांचा समावेश होता. औषधी उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण नाही आणि ही रुग्णालये ओस पडली आहेत. त्यामुळे शासनाकडून या रुग्णालयात औषधींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.