सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडलाय स्वस्तात पाहिजे का? आमिष देऊन लुटणारी टोळी पकडली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:12 PM2022-07-06T18:12:06+5:302022-07-06T18:12:23+5:30
पुंडलिकनगर पोलिसांची कामगिरी : सोन्याच्या बनावट २ हजार नाण्यांसह धारदार शस्त्रही जप्त
औरंगाबाद : सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडला असून, हे गुप्तधन गुपचुप स्वस्तात विक्री करण्याचे आमिष दाखवून लुटमारीच्या उद्देशाने शहरात आलेल्या टोळीला पुंडलिकनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. टोळीतील दोघांवर फसवणूक, दरोडा आणि लुटमारीचे गुन्हे आहेत. त्यांच्याकडून बनावट सोन्याची २ हजार नाणी, कार, धारदार शस्त्र, मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
मंगलसिंग प्रल्हाद पवार, फकिरा शहा सुलेमान शहा (वय ३२), राजेश प्रल्हाद पवार (२४, तिघे रा. पिंपळगाव सराई, जि. बुलडाणा) रवींद्र सुखदेव म्हस्के (रा. हिवरा काबली, ता.जाफ्राबाद, जि. जालना), सुभाष शामराव सुरूसे (४८, रा. मातला, जि. बुलडाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. एकजण पसार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे हे मंगळवारी गस्तीवर होते. तेव्हा सापडलेल्या गुप्तधनातील सोन्याची नाणी स्वस्तात विक्री करण्यासाठी ग्राहक शोधणारी गुन्हेगाराची टोळी शिवाजीनगरात मैदानावर थांबल्याची खबर मिळाली . ही टोळी दरोडेखोर, फसवणूक करणारी असल्याची समजले. ठाण्यातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सायंकाळी चोहोबाजूंनी घेरून संशयितांवर धाड टाकली. यावेळी धरपकडीत गौतम नावाचा संशयित तेथून पळून गेला. पंचांसमक्ष संशयितांच्या कारची झडली घेतली असता, त्यांच्याजवळ १ किलो ७७५ ग्रॅमची बनावट सोन्याची एकूण २ हजार नाणी, धारदार चाकू, चार मोबाईल, रोख रक्कम, कार असा सुमारे ४ लाख २९ हजार ३९० रुपयांचा ऐवज आढळला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, एसीपी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गांगुर्डे, सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक काळे, विठ्ठल घोडके, गणेश माने, मीरा चव्हाण, सहायक उपनिरीक्षक विष्णू मुंढे, रमेश सांगळे, हवालदार बाळाराम चौरे, गणेश वैराळकर, गणेश डोईफोडे, जालिंदर मांटे, संतोष पारधे, रज्जूसिंग सुलाने, कल्याण निकम यांनी केली.
दोन आरोपी अट्टल गुन्हेगार
अटकेतील टोळीतील मंगलसिंग पवार आणि सुभाष सुरूसे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यांच्यावर यापूर्वी बुलडाणा जिल्ह्यात जबरी चोरी, दरोडा आणि फसवणुकीचा गुन्हा केल्याची नोंद आहे.