विभागप्रमुखांनी रांग लावायची का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:06 AM2017-07-21T01:06:49+5:302017-07-21T01:14:16+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागप्रमुखांची बुधवारी बैठक बोलावण्यात आली होती.

Should the department head queue? | विभागप्रमुखांनी रांग लावायची का?

विभागप्रमुखांनी रांग लावायची का?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागप्रमुखांची बुधवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत एम. फिल. अभ्यासक्रमाच्या संदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले. याच बैठकीत विभागप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकाचा समाचार घेतला. विभागातील प्रत्येक कामाच्या फाईलवर मंजुरीसाठी विभागप्रमुखांनी कुलगुरू, कुलसचिवांकडे यायचे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. एका विभागप्रमुखाने तर ‘आता आम्ही रांगेत उभे राहायचे का’असे म्हणत विद्यापीठाच्या कारभारावर ओरखडे काढले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठातील एम. फिल. अभ्यासक्रमाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. या बैठकीत प्रशासनाने काही दिवसांपूर्वी विभागाच्या कोणत्याही कामासंदर्भात विभागप्रमुखांनी स्वत: येऊन कुलगुरू, कुलसचिवांसह इतर अधिकाऱ्यांची परवानगी घ्यायची, असे परिपत्रक काढले होते. या परिपत्रकांवर विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. रत्नदीप देशमुख आदींनी आक्षेप नोंदविला. विभागप्रमुखांनी आता किरकोळ कामांसाठीही कुलगुरू दालनाबाहेर रांगा लावायच्या का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सारवासारव करीत हे परिपत्रक विभागप्रमुखांसाठी नसून, उपकुलसचिवांसाठी असल्याचे सांगितले. यानंतर हा विषय शांत झाला.
५ हजार रुपयांच्या मर्यादेवर नाराजी
विभागातील किरकोळ कामांसाठी ५ हजार रुपयांपर्यंतच विभागप्रमुखांनी खर्च करावेत, पुढील खर्चासाठी प्रशासनाची मंजुरी घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यावर विभागप्रमुखांनी नाराजी व्यक्त केली. विभागाच्या दैनंदिन कामकाजासाठी १० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याचा अधिकार होता. मात्र हा अधिकार कमी केला असल्याकडे विभागप्रमुखांनी कुलगुरूंचे लक्ष वेधले. या बैठकीत अनेक विभागांमध्ये ११ महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर प्राध्यापक घेण्यासाठी मंजुरी दिल्याचे समजते.

Web Title: Should the department head queue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.