प्रसाद वाटप करताना गणेश मंडळांनी काय खबरदारी घ्यावी?
By साहेबराव हिवराळे | Published: September 22, 2023 03:04 PM2023-09-22T15:04:11+5:302023-09-22T15:04:30+5:30
अन्न व औषध प्रशासनाकडून निर्देश जारी
छत्रपती संभाजीनगर : श्री गणेशोत्सवात आरती व प्रसाद वाटपासह अन्नदानाच्याही पंगती काही ठिकाणी होतात. मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटप करताना स्वच्छतेच्या तसेच अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने शहरातील मंडळांना दिल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासन, विभागाचे सहआयुक्त अजित मैत्रे यांच्या निर्देशानुसार आरतीनंतर वाटप करण्यात येणारा प्रसाद आवश्यक तेवढाच ताजा बनवून भाविकांना देण्यात यावा. प्रसादाला धूळ, माती, माशा, मुंग्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी. प्रसाद तयार आणि वाटप करणाऱ्या व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत, त्यांनी साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामास सुरुवात करावी. प्रसाद तयार करण्यासाठी व भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे. पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करूनच पिण्यास द्यावे. भांड्याचा वापर करण्यापूर्वी ती साबणाने घासून व स्वच्छ पाण्याने धुवूनच वापरावीत. भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा तसेच भांडी स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवावीत.
तुम्ही खरेदी केलेल्या साहित्याचे बिल घ्यावे...
श्री गणेश मंडळांनी किराणा मालाची खरेदी परवानाधारक दुकानातूनच करावी आणि खरेदीचे बिल घ्यावे. सणाच्या काळात मालातील भेसळ व दक्षता म्हणून भक्तांंनी सूचना पाळणे गरजेचे आहे.
- निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी