आमचे तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का ? पोलीस भरतीला स्थगितीने संताप
By राम शिनगारे | Published: November 3, 2022 11:57 AM2022-11-03T11:57:54+5:302022-11-03T11:58:36+5:30
सतत लांबणाऱ्या भरतीविषयी तरुणांमध्ये संतापाचे वातावरण
- राम शिनगारे
औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये भरतीला मिळालेल्या स्थगितीमुळे संतापाचे वातावरण आहे. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यातील किती जागा भरणार याविषयीची माहिती जाहीर केली. तसेच प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक, आयुक्तांनी पोलीस भरती करण्याविषयीची जाहिरात १ नोव्हेंबर रोजी द्यावी, असे आदेशही प्रशिक्षण व खास पथके विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिले होते. या आदेशाला २४ तास उलटण्यापूर्वीच स्थगिती देण्यात आली. त्यामुळे तयारी करणाऱ्या युवकांमध्ये संतापासह संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस भरती पुढे ढकलली
मागील काही वर्षांपासून सतत पोलीस भरती होणार असल्याची घोषणा राज्यकर्ते करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या लाटेनंतर २०२१ मध्ये रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात भरती झालीच नाही. त्याच रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय विद्यमान राज्य शासनाने घेतला. त्याची घोषणा झाल्यानंतर १२ तासांच्या आत तांत्रिक कारणास्तव भरती पुढे ढकलल्याचे जाहीर केले.
जिल्ह्यात १९३ पदांसाठी होणार भरती
जाहीर केलेल्या जागांमध्ये शहर आयुक्तालयात एकही जागांची भरती दाखविण्यात आलेली नव्हती; तर ग्रामीण पोलीस विभागात ३९ आणि औरंगाबाद लोहमार्ग विभागात १५४ अशा एकूण १९३ जागांसाठी भरती होणार आहे.
तरुणांच्या भावनांशी खेळ
पाच वर्षांपासून औरंगाबादेत भाड्याच्या खोलीत राहून भरतीची तयारी करीत आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असताना आई-वडील मोलमजुरी करून पैसे पुरवतात. शासन केवळ भरतीची घोषणा करून आमच्या भावनेशी खेळते आहे.
- नंदकिशोर सवडे, भरतीची तयारी करणारा तरुण
तयारीत डोक्यावरील केस गेले
गेल्या ४ वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत आहे. आई-वडील ऊसतोड करतात. आजपर्यंत शासनाने केवळ घोषणाच केल्या. भरती मात्र झालीच नाही. एवढ्या तयारीत डोक्याला केस राहिले नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही जगणार तरी कसे?
- कृष्णा जराड, भरतीची तयारी करणारा तरुण
वेळेवर भरती का होत नाही
माझी मुलगी गेल्या पाच वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. मी ऊस तोडणी करून मुलीला शिकवते. आर्थिक परिस्थिती बिकट असताना शासन वेळेवर पोलीस भरती का घेत नाही. त्याचा मानसिक त्रास आम्हाला होतो.
- ज्योती सिरसाट, पालक
मुलांना मोलमजुरी करून शिकवितो
माझा मुलगा, मुलगी मागील चार वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मुलांना मोलमजुरी करून शिकवितो. मुलंही दिवस-रात्र तयारी करीत आहेत, पण भरती वेळेवर होत नाही.
- गणेश मुळे, पालक