फळ्याकडे पहावे की पडक्या भिंती, छताकडे? विद्यार्थी, शिक्षकांवर घोंगावते संकट
By विजय सरवदे | Published: August 11, 2023 03:48 PM2023-08-11T15:48:21+5:302023-08-11T15:48:55+5:30
निजामकालीन शाळा खोल्या बांधकामाचा चकवा
छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण मराठवाड्यात धोकादायक असलेल्या जिल्हा परिषदेच्या तब्बल ७१८ शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, आजही काही ठिकाणी त्याच शाळा खोल्यांत विद्यार्थी जीव मुठीत धरून विद्यार्जन करीत आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दोन वर्षांपूर्वीच निजामकालीन वर्गखोल्या पुनर्बांधणीसाठी औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना या शाळांमध्ये १६२३ वर्गखोल्या बांधकामासाठी १६१ कोटी २३ लाखांचा निधी मंजूर केला. मात्र, केवळ लोकसहभागाअभावी या वर्गखोल्यांची उभारणी रखडली आहे.
राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत महाविकास आघाडी सरकारच्या काळात निजामकालीन वर्गखोली पुनर्बांधणीचा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी निधीही मंजूर केला. औरंगाबाद जिल्ह्यातील ८१ शाळांमध्ये १७३ वर्गखोल्या उभारणीसाठी १५ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर केला. त्यापैकी आजपर्यंत दोन टप्प्यात ८ कोटी ८७ लाखांचा निधी प्राप्त झाला. ही कामे कंत्राटदारांमार्फत न करता ती शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केली जात आहेत. परंतु, यासाठी १० टक्के शाळा व्यवस्थापन समितीने लोकसहभागाची रक्कम किंवा बांधकाम साहित्याचा पुरवठा करणे बंधनकारक आहे, तर उर्वरित १० टक्के रक्कम जिल्हा परिषदांनी उपकरातून जमा करण्याची अट आहे.
जिल्हा परिषदांनी मात्र, उपकराची १० टक्के रक्कम जमा करण्याऐवजी २० टक्के रक्कम लोकसहभागातूनच खर्च करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे आजघडीला तीन शाळांतील अवघ्या ५ वर्गखोल्या उभारण्यात आल्या आहेत. उर्वरित ८३ खोल्यांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे, तर ३५ शाळांच्या ठिकाणी ८५ वर्गखोल्यांची कामे अजूनही सुरूच झालेली नाहीत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत जवळपास हीच परिस्थिती मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांची असल्याचे समोर आले. निजामकालीन शाळा किंवा वर्गखोल्या तर शासनाने ‘हेरिटेज’ म्हणून घोषित केले आहे. मग, अशा शाळा खोल्या कशा पाडता येतील, यावर समोर आलेली माहिती अशी की, मराठवाड्यात कुठेही निजामकालीन शाळा खोल्या नाहीत. निजामकालीन वर्गखोली पुनर्बांधणी हे केवळ लेखाशीर्ष आहे. या लेखाशीर्षांतर्गत निधीची तरतूद करण्यात आली असून त्यातून नवीन शाळा खोलीचे बांधकाम करायचे आहे.
कुठे, किती शाळांत वर्गखोल्या उभारणार
जिल्हा- शाळा- वर्गखोल्या
औरंगाबाद- ८१- १७३ जालना- १५६- ३३२ बीड- २१७- ३५२ हिंगोली- ४२- १२६ परभणी- ५६- १८५ नांदेड- १०५- २६४ लातूर- ३२- ९५ उस्मानाबाद- २९- ९६