महापालिकेच्या ७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; तिघांचे थांबविले वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 01:33 PM2020-08-13T13:33:38+5:302020-08-13T13:36:13+5:30
ऑगस्ट महिन्यातही डिमांड नोट मालमत्ताधराकांना पोहोचल्या नसल्याबद्दल महापालिका प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली
औरंगाबाद : मागील ६ महिन्यांपासून संपूर्ण महापालिका कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ताकदीने कामाला लागली आहे. कोरोनाच्या कामकाजातून हळूहळू प्रशासन बाहेर पडत असून, बुधवारी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सकाळी ११.३० वाजेपासून अचानक वॉर्ड कार्यालयांची झाडाझडती सुरू केली. मालमत्ता कराच्या डिमांड नोटिसा नागरिकांना वाटप न केल्यामुळे ७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. तीन कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा आदेशही त्यांनी दिला. प्रशासकांच्या या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ऐन मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. लॉकडाऊनमुळे तर दैनंदिन खर्च भागविणेदेखील प्रशासनाला अवघड झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल होताच मालमत्ता कर वसुलीची मोहीम १५ आॅगस्टनंतर हाती घेण्याचा निर्णय पाण्डेय यांनी घेतला आहे. बुधवारी त्यांनी वॉर्ड क्रमांक ३, ४, ५, ६ आणि ७ या तब्बल पाच कार्यालयांना भेटी दिल्या. त्यांनी वसुली कर्मचाऱ्यांची झडती सुरू केली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत हा पाहणी दौरा सुरू होता. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात कामकाजाची पद्धत आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वसुलीच्या रेकॉर्डची मागणी त्यांनी कर्मचाऱ्यांकडे केली. अचानक आणि तेही प्रशासक समोर थांबून रेकॉर्ड मागत असल्याने कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. अनेकांना माहितीही देता आली नाही. काही कर्मचाऱ्यांच्या कपाटात डिमांड नोट तशाच पडून होत्या. त्यामुळे पाण्डेय संतप्त झाले.
आॅगस्ट महिन्यातही डिमांड नोट मालमत्ताधराकांना पोहोचल्या नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करीत सात जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश दिले, तसेच तीन जणांचे वेतन थांबविण्याचा आदेश दिला. जोपर्यंत त्यांच्या कामात सुधारणा होत नाही, तोपर्यंत वेतन देऊ नका, असे पाण्डेय यांनी नमूद केले. सप्टेंबर महिन्यात मी पुन्हा वॉर्ड कार्यालयांमध्ये येऊन प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कपाटाची झाडाझडती घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. वॉर्ड क्रमांक ५ मधील एका लिपिकाला जागेवरच निलंबित करा, असा आदेश प्रशासकांनी दिला. मात्र, सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
असमाधानकारक काम
वॉर्ड कार्यालयांमध्ये कर्मचारी- अधिकाऱ्यांना सोयी-सुविधा आहेत का? याची पाहणी करण्यासाठी बुधवारी प्रशासकांनी अचानक पाहणी केली. मालमत्ता कराच्या वसुलीचा आढावादेखील घेतला. ज्यांचे काम समाधानकारक नाही, त्यांना नोटिसा बजावण्याचा व काहींचे वेतन थांबविण्याचा आदेश दिला.
-नंदकिशोर भोंबे, कर निर्धारक व संकलक
गुंठेवारीच्या फायली प्रलंबित का?
प्रत्येक वॉर्ड कार्यालयात प्रशासक पाण्डेय यांनी गुंठेवारीच्या फायलींची पाहणी केली. अनेक फायलींमध्ये नगररचना विभागाने अभिप्राय दिलेला नसतानाही फाईल रद्द केल्याचे दिसून आले. वॉर्ड अधिकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक सर्व फायलींची तपासणी करून निर्णय घ्यावा, अशी सूचनासुद्धा त्यांनी केली.