ओळखपत्र दाखवा अन् मोफत उपचार घ्या; ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅनही नि:शुल्क
By संतोष हिरेमठ | Published: August 17, 2023 03:12 PM2023-08-17T15:12:15+5:302023-08-17T15:16:12+5:30
ओपीडीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषधे, इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चिठ्ठी देऊ नये, अशी सूचना.
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा रुग्णालयासह सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये १५ ऑगस्टपासून नि:शुल्क रुग्णसेवेला सुरुवात झाली. शासनाने अधिकृत केलेले ओळखपत्र दाखविले की अगदी मोफत उपचार घेता येत आहेत. इतकेच काय ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅनसारख्या तपासण्याही मोफत होत आहेत. पहिल्याच दिवशी अनेक रुग्णांनी नि:शुल्क रुग्णसेवा घेतली.
पहिल्या दिवशी किती रुग्णांवर मोफत उपचार?
जिल्हा सामान्य रुग्णालयात नि:शुल्क रुग्णसेवेला सुरुवात झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांनी सांगितले. पहिल्या दिवशी ओपीडीत ६१० रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ यांनी दिली. यात ३५ जणांचे एक्स-रे, ५२ जणांची अल्ट्रासोनोग्राफी आणि ५ जणांचे सीटी स्कॅन करण्यात आले.
किती पैशांची बचत?
जिल्हा रुग्णालयात पूर्वी ओपीडीसाठी १० रुपये, एक्स-रेसाठी ७५ रुपये, अल्ट्रासोनोग्राफीसाठी १०० रुपये आणि सीटी स्कॅनसाठी ३०० रुपये आकारण्यात येत असत. परंतु, आता हे सर्व मोफत होत आहे.
नि:शुल्क सेवेत काय काय?
- शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे नि:शुल्क नोंदणी.
- सर्व प्रकारच्या तपासण्या नि:शुल्क.
- ओपीडीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषधे, इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चिठ्ठी देऊ नये, अशी सूचना.
- क्वचित प्रसंगी बाहेरील औषधे रुग्णाला देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून खरेदी करून रुग्णाला मोफत उपलब्ध करून देणे.
- ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या नि:शुल्क.
- आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दाखल रुग्णाला डिस्चार्ज देताना कोणतेही शुल्क लागणार नाही.