शोले स्टाइल आंदोलन २८ तासांनंतर घेतले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:07 AM2021-03-04T04:07:08+5:302021-03-04T04:07:08+5:30
सिल्लोड : शहरात पाण्याच्या टाकीवर चढून मंगळवारी सकाळपासून सुरू असलेले शोले स्टाइल आंदोलन दुसऱ्या दिवशी बुधवारी अठ्ठावीस ...
सिल्लोड : शहरात पाण्याच्या टाकीवर चढून मंगळवारी सकाळपासून सुरू असलेले शोले स्टाइल आंदोलन दुसऱ्या दिवशी बुधवारी अठ्ठावीस तासांनंतर उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
कामगारांना गेल्या दोन महिन्यांचा थकलेला पगार मिळावा, कामावरून कमी केलेल्या ६० जणांना पुन्हा नगर परिषदेच्या वतीने कामावर रुजू करून घ्यावे, आंदोलनकर्त्यांनी सर्व कामगारांचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय समिती नियुक्त करून, मुख्याधिकारी, कॉन्ट्रॅक्टर यांची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी कामगारांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील टिळकनगरजवळील पाण्याच्या टाकीवर शोले स्टाइल आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंदोलकांच्या मागणीप्रमाणे त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, ही समिती १२ मार्च रोजी प्रत्यक्ष सर्वांची बैठक घेऊन अंतिम चर्चा करून, चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवील, असे आश्वासन ब्रिजेश पाटील यांनी दिले. त्यानंतर हे शोले स्टाइल आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष कमलेश कटारिया, भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुल्तानी, महेश शंकरपेल्ली, मनोज मोरेल्लू, सुनील मिरकर, विष्णू काटकर, शेख रफिक, अमोल ढाकरे, अरुण राठोड, किरण पवार, मधुकर राऊत, विशाखा गायकवाड यांची उपस्थिती होती.
फोटो = आंदोलनकांना लेखी आश्वासन दिल्याने शोले स्टाइल आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे आदी.