वेध श्रावणाचे! चल गं बाई खेळू या, मंगळागौर खेळू या...
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 10, 2023 08:07 PM2023-08-10T20:07:56+5:302023-08-10T20:08:32+5:30
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील गाण्यावर महिला मंडळांचा सराव
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक महिलेला आपली कहाणी वाटावी, असा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील सर्वच गाणी हिट ठरली आहे. त्यातील ‘चल गं बाई खेळू या, मंगळागौर खेळू या’ हे गाणे पाहिल्यापासून महिलांना श्रावणाचे वेध लागले आहेत. कधी एकदा श्रावण मंगळवार येते व सर्वजणी मिळून मंगळागौर खेळतो, अशी भावना प्रत्येकीच्या मनात निर्माण झाली आहे. या गाण्याची क्रेझ बघून महिला मंडळांनीही याच गाण्यावर नृत्याचा सराव सुरू केला आहे.
महिला कधी करतात प्रॅक्टिस
शहरात मंगळागौरीचे खेळ खेळणारे दहापेक्षा अधिक महिला मंडळ तयार झाले आहेत. या मंडळांमध्ये ज्या महिला आहेत त्यातील बहुतांश महिला या नोकरी करणाऱ्या आहेत. काही महिला गृहउद्योग सांभाळून सायंकाळच्या वेळी प्रॅक्टिसला येतात. ज्या महिला घरकाम करतात त्या दुपारच्या वेळीस प्रॅक्टिस करतात. घरसंसार, नोकरी, उद्योग संभाळून या महिला प्रॅक्टिस करतात.
मंगळागौरीच्या गाण्यातून सामाजिक संदेश
आम्ही मंगळागौरीच्या गाण्यावर नृत्य करण्याची प्रॅक्टिस करत आहोत. दरवर्षी या खेळात नावीन्य आणले जाते. यंदा ‘बाईपण भारी देवा’तील मंगळागौरीच्या गाण्यावर आम्ही सराव करत आहोत. त्यातून सामाजिक संदेश मिळेल.
- अनुराधा पुराणिक, ओंजळ ग्रुप
कोणाच्या घरी असतो मंगळागौरीचा सण?
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर सण साजरा केला जातो. मंगळागौरीचे व्रत केल्याने नवविवाहितेला अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभते, अशी धारणा आहे. ज्यांच्या घरी सुनेची पहिलीच मंगळागौर आहे. अशा घरात तसेच त्या विवाहितेच्या माहेरी मंगळागौर सण थाटामाटात साजरा केला जातो. लग्नानंतर पुढील पाच वर्षे ही मंगळागौर खेळण्याची प्रथा आहे.
कोणत्या तारखांना आहे मंगळागौर पूजन?
पहिले मंगळागौर पूजन - २२ ऑगस्ट
दुसरे मंगळागौर पूजन-२९ ऑगस्ट
तिसरे मंगळागौर पूजन- ५ सप्टेंबर
चौथे मंगळागौर पूजन - १२ सप्टेंबर