अर्ध्या मराठवाड्यात श्रावणसरी; अनेक जिल्ह्यांत सूर्यदर्शनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:48 PM2020-08-17T13:48:33+5:302020-08-17T13:54:45+5:30
परभणी, नांदेड, लातूर, औरंगाबादेत पाऊस
औरंगाबाद : लातूर, परभणी, नांदेड व औरंगाबादेत श्रावणसरी कोसळल्याने अर्धा मराठवाडा चिंब झाला. अनेक ठिकाणी सूर्यदर्शनच झाले नाही. तसेच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
लातूर : रिमझिम
लातूर : जिल्ह्यात आठवडाभरापासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील पिके बहरली आहेत़ मूग दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे, तर सोयाबीन फुलो-यात आहे़ काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी कीडनाशकांची फवारणी करीत आहेत़ या पावसामुळे त्यात व्यत्यय येत असून आणखीन किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतक-यांतून व्यक्त होत आहे़
परभणी : पिकांना दिलासा
परभणी : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही भीज पाऊस होत आहे. या पावसामुळे सोयाबीन-कापूस या दोन्ही पिकांना दिलासा मिळाला असून, पिकांच्या वाढीसाठी पाऊस पोषक मानला जात आहे. चार दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने भूजल पातळीत कमालीची वाढ झाली असून, प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५०४ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात ९९.५४ टक्के पाणीसाठा झाला.
नांदेड : भोकरला सर्वाधिक
नांदेड : जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १३़६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ यात सर्वाधिक भोकर तालुक्यात ४३़१ मि़मी़ पाऊस झाला़ हिमायतनगर तालुक्यात २० मि़मी़, देगलूर तालुक्यात १६़८ मि़मी़, किनवट १५़६ मि़मी़, नांदेड ८ मि़मी़, बिलोली १०़७ मि़मी़, मुखेड १२़६ मि़मी़, कंधार ५़३ मि़मी़, हदगाव १२़३ मि़मी़, मुदखेड १०़९ मि़मी़, हिमायतनगर २० मि़मी़, माहूर ११़४ मि़मी, धर्माबाद १८़१ मि़मी़, उमरी २०़२ मि़मी़, अर्धापूर १२़६ मि़मी़ आणि नायगाव तालुक्यात ११़४ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़
हिंगोली : जलसाठा वाढला
कळमनुरी/ औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : यावर्षी मृग नक्षत्रापासूनच दमदार पाऊस पडत आहे़ मागील २ ते ३ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे़ त्यामुळे जलस्तर वाढला आहे़ पावसामुळे इसापूर धरणाचा पाणीसाठा वाढतच चालला आहे़ धरणात सध्या ५७़ ६१ टक्के जलसाठा आहे़
‘सिद्धेश्वर’चे दरवाजे उघडले
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या १४ दरवाजांपैकी आठ दरवाजे उघडण्यात आले असून, याद्वारे ८ हजार ९१३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरल्याने मागील चार दिवसांपासून टप्प्याटप्प्याने धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत.