‘शुभ दिवाळी,स्वच्छ दिवाळी’; महापालिकेची दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेवर भर
By मुजीब देवणीकर | Published: November 6, 2023 02:54 PM2023-11-06T14:54:15+5:302023-11-06T14:58:04+5:30
डेब्रिज वेस्ट उचलणे सुरू, शहरात बुधवारपासून महास्वच्छता अभियान
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीपूर्वी अनेक नागरिक घर स्वच्छ करतात, रंगरंगोटीही करतात. त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर येतो. दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने महापालिका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. ‘शुभ दिवाळी, स्वच्छ दिवाळी’ या माेहिमेंतर्गत शहरातील खुल्या जागा, ठिकठिकाणी पडलेले बांधकाम साहित्य उचलण्यास सुरूवात केली आहे. बुधवारपासून महास्वच्छता अभियानाला सुरूवात होणार असल्याची माहिती उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी दिली.
शहरात दररोज ३५० ते ४०० मे. टन कचरा जमा होतो. दिवाळीत कचऱ्याचे प्रमाण दुप्पट होते. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी मागील आठवड्यातच बैठक घेऊन कचऱ्याचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना घनकचरा विभागाला दिल्या. उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, जवान यांची बैठक घेऊन कामाचे स्वरूप समजावून सांगितले. मागील दोन दिवसांपासून प्रत्येक झोननिहाय खुल्या जागांवरील बांधकाम साहित्य, कचरा, मिक्स कचरा उचलण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
या कामात रेड्डी कंपनीची मदत घेण्यात आली. महापालिकेच्या यांत्रिकी विभागानेही हायवा, टिप्पर अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत हे काम चालेल. त्यानंतर लगेचच संपूर्ण शहरात महास्वच्छता अभियान राबविले जाईल. शहरात कुठेही दिवाळीत कचरा दिसणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. नागरिकांनीही शहर स्वच्छ व सुंदर दिसावे, यासाठी कुठेही कचरा टाकू नये. घंटागाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन जाधव यांनी केले. शहरात जमा होणारा संपूर्ण कचरा पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येणार आहे. त्याचदिवशी कचऱ्यावर प्रक्रियाही केली जाईल.
मनपाची स्वच्छतेत असलेली यंत्रणा:
- १० वॉर्ड कार्यालयांतर्गत स्वच्छता
- ५२ स्वच्छता निरीक्षक
- ११५ जवान
- १५०० सफाई कर्मचारी
- ११०० रेड्डी कंपनीचे कर्मचारी