मध्यरात्री ‘शुभमंगल सावधान';भक्तांच्या साक्षीने बारवेतील मंदिरात शिव-पार्वतीचे थाटात लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 07:29 PM2022-03-02T19:29:42+5:302022-03-02T19:30:51+5:30
रात्री १२ वाजता शिव-पार्वतीवर भक्तांनी टाकल्या अक्षता
औरंगाबाद : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर १ मार्च मध्यरात्री १२ वाजता. भावसिंगपुऱ्यातील बारवेत ५० फूट खोलातील सत्येश्वर मंदिरात... ‘कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान’ असे मंगलष्टकाचे सूर कानावर पडले. अन् उपस्थित शेकडो भाविकांनी नवरा-नवरीवर अक्षता टाकल्या. टाळ्यांचा कडकडाट केला. सनाई-चौघडे वादन आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दणाणून गेला, भगवान शिव-पार्वतीचे लग्न लागताच त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. ‘याचि देही याचि डोळा’ भगवंतांचा हा लग्नसोहळा पाहून आम्ही धन्य झालोे’, अशी भावना प्रत्येक शिवभक्त व्यक्त करीत होता.
सुमारे ३५० वर्षे जुने सत्येश्वर महादेव मंदिर जु्न्या भावसिंगपुऱ्यात शेतातील एका मोठ्या बारवेत आहे. येथे भगवान शंकर व पार्वतीची समोरासमोर मंदिरे आहेत. येथे परंपरेनुसार महाशिवरात्रीला शिव-पार्वतीचे लग्न रात्री १२ वाजता लावले जाते. आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता महादेव पिंडीला अभिषेक करून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात झाली. पहाटेपासूनच अभिषेक, दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावणे सुरू केले होते. रात्री पुजारी सदाशिव खेळतोंड यांनी महादेवास तर त्यांच्या पत्नीने पार्वतीच्या मूर्तीला हळद लावली, त्यानंतर पार्वतीला भरजरी साडी नेसविण्यात आली. अलंकाराने नटविण्यात आले. जिथे जागा मिळेल तिथे भाविक उभे राहून देवाचा विवाह सोहळा पाहत होते. दोन्ही मंदिराच्या मधोमध अंतरपाट धरण्यात आला आणि बरोबर १२ वाजेच्या सुमारास ‘मंगलाष्टक़’ सुरू झाले. ‘आली लग्न घटी समीप नवरा घेऊनी यावा घरा.... कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान’ मंगलाष्टक कानी पडले. मंगलधून वाजली आणि फटाक्यांची आतषबाजी झाली. भगवंतांच्या लग्न सोहळ्यासाठी भावसिंगपुरावासीय मध्यरात्री उशिरापर्यंत जागे होते.
लग्नासाठी शहरातून आले भाविक
भगवान शिव-पार्वतीचा विवाह सोहळा अनुभवण्यासाठी शहरातून २० कि.मी अंतर पार करीत अनेक भाविक जुन्या भावसिंगपुऱ्यात दाखल झाले होते. यामुळे विवाह सोहळ्याची आणखी रंगत वाढली होती. संपूर्ण बारव रोषणाईने लखलखली होती.