निसर्गरम्य शूलिभंजन उपेक्षित पर्यटनस्थळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 07:09 PM2019-04-21T19:09:52+5:302019-04-21T19:11:19+5:30

पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहे

Shulibhanjan is a neglected tourist destination! | निसर्गरम्य शूलिभंजन उपेक्षित पर्यटनस्थळ !

निसर्गरम्य शूलिभंजन उपेक्षित पर्यटनस्थळ !

googlenewsNext

- ऋचिका पालोदकर

औरंगाबादहून वेरूळ मार्गावर असणारे शूलिभंजन हे ठिकाण आजही उपेक्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी असणारे हे ठिकाण जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि दौलताबाद किल्ला यांच्या अगदी जवळ आहे. या दोन्ही ठिकाणी येणारे पर्यटक शूलिभंजनला जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. मात्र, या ठिकाणचा पर्यटन स्थळ म्हणून विकास न झाल्यामुळे आजही हे ठिकाण पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.

औरंगाबादपासून ३० कि.मी. अंतरावर असलेले शूलिभंजन हे ठिकाण दत्तात्रयाचा साक्षात्कार झालेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. ‘शूलिभंजन’, ‘सूर्यभंजन’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. खुलताबादपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शूलिभंजनबाबत अनेक धार्मिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हिंदू गं्रथातील काशीखंड, पद्मपुराण, दत्त प्रबोध, नाथचरित्र या प्राचीन गं्रथातही या ठिकाणचा उल्लेख आढळतो. मार्कं डेयऋषींनी याठिकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. 

नाथचरित्रात आलेल्या उल्लेखानुसार संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी साधना केली होती. म्हणून या स्थळाला संत एकनाथांचे साधनास्थळ म्हणूनही ओळखले जाते, असे म्हणतात की, एकनाथ महाराज दररोज देवगिरी किल्ल्यावरून शूलिभंजन गडावर यायचे आणि येथे येऊन आराधना करायचे. देवगिरी किल्ल्यापासून शूलिभंजनपर्यंत एक भूमिगत मार्ग असावा आणि याच मार्गाने एकनाथ महाराज ये-जा करत असावेत, असा अंदाजही बांधला जातो. सध्या या गडावर जेथे दत्त मंदिर आहे, त्याच ठिकाणी दत्तात्रयाने एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला होता, असे सांगितले जाते.

मंदिराच्या बाहेर एक शिळा आहे. या शिळेवर बसून एकनाथांनी साधना केली होती, असे म्हणतात. त्या शिळेवर एका लहान दगडाने आघात केल्यास त्या गोलाकार शिळेतून घंटीप्रमाणे मंजूळ आवाज येतो. मंदिर परिसरातील इतर कोणत्याही शिळांमधून असा स्वर ऐकू येत नाही. एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी यांची पहिली भेटही याच स्थळी झाली होती, असे मानले जाते. ४०० फूट उंचावर असलेल्या शूलिभंजन येथे कायम थंड हवा असते. याशिवाय ध्यानधारणा करण्यासाठी ही जागा सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. मंदिराच्या जवळ गरम पाण्याचे दोन झरे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणचे सौंदर्य अधिकच बहरून येते. अनेक आकर्षक फुलांचे ताटवे ठिकठिकाणी फुलून आलेले दिसतात. अनेक लहान-मोठे धबधबे वाहू लागतात. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण असून, पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहेत. 

तीन वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हैसमाळ- खुलताबाद- शूलिभंजन पर्यटन प्राधिकरणाला मंजुरी देण्यात आली होती. दोन वर्षांमध्ये या परिसराचा संपूर्ण विकास करून येथे पर्यटनाला चालना देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असून शूलिभंजनचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांपासून दूरच आहे.

 

Web Title: Shulibhanjan is a neglected tourist destination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.