औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 07:10 PM2018-10-24T19:10:29+5:302018-10-24T19:11:18+5:30

जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Shutdown on Friday for water supply in Aurangabad; In the city, there will be dry day for two days | औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी 

औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी 

googlenewsNext

औरंगाबाद : जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या शटडाऊनसोबतच महापालिकाही जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत १४०० आणि ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणार आहे. दिवाळीपूर्वी एकदा शटडाऊन घेण्याचा मनोदय मनपाने व्यक्त केला होता. शुक्रवारी आणि शनिवारी औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी येथील पाणीपुरवठ्याची यंत्रणा आॅक्सिजनवर आली आहे. विजेच्या अंतर्गत केबल, पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रणाही खराब झाली आहे. आहे त्या परिस्थितीत महापालिका पाणीपुरवठा करीत आहे. अलीकडेच जलतज्ज्ञांनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठ्याचा अभ्यास केला. यामध्ये प्रचंड त्रुटी आढळून आल्या आहेत. मुख्य जलवाहिन्यांवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याचा अहवालही आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. पाण्याची गळती अवघ्या २ टक्क्यांवर आणल्यास शहरातील लाखो नागरिकांना फायदा होईल, असेही मनपा आयुक्तांनी नमूद केले होते.

जायकवाडी पंप हाऊस येथील वीजपुरवठ्याची यंत्रणाही खिळखिळी झाली आहे. शुक्रवार, दि. २६ आॅक्टोबर रोजी वीज कंपनी दुरुस्तीसाठी ७ तास वीजपुरवठा बंद ठेवणार आहे. या बंद काळात जायकवाडी येथील वीज कंपनीची यंत्रणा दुरुस्त करण्यात येईल. या कामासोबतच महापालिकाही जलवाहिन्यांची दुरुस्ती, केबल बदलणे आदी छोटी-छोटी कामे हाती घेणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. अधिकृतरीत्या ७ तासांचा खंडण काळ असला तरी तो किमान ९ तास चालण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होणार
शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील विविध पाण्याच्या टाक्यांमध्ये जेवढे पाणी असेल तेवढे नागरिकांना देण्यात येईल. त्यानंतर दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रात्री ७ वाजता जायकवाडी येथील काम संपल्यावर शहरात पाणी आणण्याचे काम सुरू होईल. रात्री १२ नंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. शहरातील पाण्याच्या सर्व टाक्या भरण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत वेळ लागणार आहे. ज्या वसाहतींना शुक्रवारी पाणीपुरवठा होणार होता त्यांना थेट रविवारीच पाणी मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी ज्यांना पाणी देण्यात येणार होते त्यांना सोमवारची वाट पाहावी लागेल.

Web Title: Shutdown on Friday for water supply in Aurangabad; In the city, there will be dry day for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.