दुरुस्तीसाठी उद्या पाणीपुरवठ्याचा शटडाऊन; शुक्रवार, शनिवारी करावा लागेल निर्जळीचा सामना
By मुजीब देवणीकर | Published: August 3, 2023 04:33 PM2023-08-03T16:33:41+5:302023-08-03T16:35:38+5:30
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहराचा पाणीपुरवठा अगोदरच विस्कळीत असताना ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जायकवाडीत विविध तांत्रिक दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होणार आहे. नागरिकांना शुक्रवारी आणि शनिवारी निर्जळीचा सामना करावा लागेल.
सिडको-हडकोसह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिमी व्यासाच्या पाणीपुरवठा योजनेवरील जायकवाडी पंपगृहात पॅनल बसिवणे, व्हॉल्व बसविणे इ. कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत शटडाऊन घेतले जाईल. पाच तासांपेक्षा अधिक वेळ या कामांना लागणार आहे. याच वेळेत ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील योजनेच्या जायकवाडी केंद्रात ३३ के.व्ही युनिटवर बसबारला जोडणी करणे इ. कामे केली जातील. शुक्रवारी जायकवाडीहून येणारे पाणी पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे शुक्रवारी, शनिवारी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत हाेईल. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.