राष्ट्रीयकृत बँकांच्या १५० शाखांचे शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 05:18 PM2020-01-31T17:18:38+5:302020-01-31T17:21:14+5:30
दिवसभरात ५ ते ६ हजार कोटीचे व्यवहार ठप्प राहिल्याचा दावा
औरंगाबाद : पगारवाढीसाठी २१ राष्ट्रीयकृत बँकांचे अडीच ते तीन हजार कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर गेले आहेत. यामुळे शुक्रवारी संपाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील बँकांच्या १५० शाखांचे शटर उघडलेच नाही. परिणामी, दिवसभरातील ५ ते ६ हजार कोटीचे व्यवहार ठप्प राहिल्याचा दावा, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन नेतृत्वाखाली नऊ संघटना एकत्र येऊन दोन दिवस बँक बंद आंदोलन सुरु केले आहे. बँकेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या एकजूटीची प्रचिती आज सकाळी झालेल्या निदर्शने दरम्यान दिसून आली. अदालत रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखे समोर असंख्य बँक कर्मचारी जमा झाले होते. निदर्शनासाठी निवडलेली जागा कमी पडल्याने रस्त्यावर कर्मचारी उभे होते. विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांची संख्याही वाखाणण्याजोगी होती. यंदा प्रथमच महिलांनीही नेतृत्व करीत ‘कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे’, ‘ हमने किया है बंद किया है सारा भारत बंद किया है’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला अनेक वर्षानंतर एवढा प्रतिसाद मिळाला. यासंदर्भात संघटनेचे पदाधिकारी सुनील शिंदे यांनी सांगितले की, पगारवाढीचा जुना करार संपुन १७ महिनेपूर्ण झाले पण अजूनही नवीन करार झाला नाही. ३० जानेवारी रोजी इंडियन बँक असोसिएशन (आयबीए ) सोबत कर्मचारी संघटनेची बैठक झाली त्यांनी २ टक्के पगारवाढ करणार असे सांगत कर्मचाऱ्यांचा अपमान केला. २० टक्के पगारवाढ व्हावी, ही मागणी आम्ही केली आहे. पगार वाढ लवकरात लवकर करण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसाचे संप पुकारला आहे. या आदोलनाला बँकेच्या निवृत्त कर्मचारी संघटनेने पाठींबा जाहीर केल्याची माहिती एन.के.जोशी यांनी केली. आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा यावेळी जगदिश भावठाणकर यांनी केली. तसेच अरुण जोशी, महेश जोशी, राजेंद्र मुंगीकर, राजेंद्र देवळे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी कैलास कानडे, इंद्रप्रकाश जैस्वाल, रविंद्र सुतावणे, मारुती निकम, जयश्री जोशी, विणा तारे, अनुराधा कुलकर्णी, गीता कळसे यांच्यासह असंख्य बँक कर्मचारी,अधिकारी हजर होते.