सफाई कामगारांचे हजेरीत फुटले बिंग
By Admin | Published: June 29, 2017 12:17 AM2017-06-29T00:17:05+5:302017-06-29T00:21:06+5:30
हिंगोली : जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या आदेशाने २८ जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी जिल्हा कचेरीच्या सभागृहात न. प. च्या सफाई कामगारांची हजेरी घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या आदेशाने २८ जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी जिल्हा कचेरीच्या सभागृहात न. प. च्या सफाई कामगारांची हजेरी घेतली. तर यात प्रत्यक्ष रस्त्यावर राबणारे आणि अधिकारी-पुढाऱ्यांच्या घरी राबणारे उघडे पडले. आता सगळेच आपल्यासोबत रस्त्यावर उतरणार असल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
नगरपालिकेमध्ये एकूण १३० सफाई कामगार आहेत. यापैकी ९० पालिकेचे कामगार तर ४० रोजंदारी कामगार आहेत. उपजिल्हाधिकारी माचेवाड यांनी बुधवारी कर्मचारीनिहाय आढावा घेतला. यातून अनेकांच्या कामाचे स्वरुप आढळून आले. मात्र सफाई कामगारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिल्या जाणाऱ्या सुविधांची जराही विचारपूस न करता त्यांच्या समस्या ऐकून न घेता सूचनांचाच भडीमार केला. वॉर्ड जास्त आणि कामगार कमी असल्याने इतर कर्मचारी कोठे काम करतात, हे सांगण्याचा प्रयत्न एका कामगाराने केला होता. मात्र ‘त्याला तुझे तू बघ’ असे म्हटल्यावर समस्या सांगण्यासाठी कोणीच पुढे यायला तयार नव्हते. तसेच न सांगता निघून जाणाऱ्या सफाई कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना सीओंना दिल्या. तर दुसऱ्या कामगाराच्या नावावर काम करणारे चार बदली कामगार असल्याचे उघड झाले. तर महिलांना ९ वारी आणि ६ वारी साडी देण्याच्या सूचना दिल्या. कडक कपड्यात आलेल्या मजुरांची तर चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनाही इतर कामगारांप्रमाणे रस्त्यावर सफाईचे काम देण्यास सांगितले. त्यामुळे अनेकजण आपापले कपडे न्याहाळत होते. रोजंदारीवर काम करणाऱ्या एकाही मजुरांना प्रश्न न केल्याने शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर हस्य होते. मात्र सूचना अशा कडक आहेत की, एकतर शहर स्वच्छ होईल नाहीतर पालिकेने कारवाई केल्यानंतर कामगारच यादीतून गायब होतील. अधिकारी व पुढाऱ्यांच्या घरी जाणे आता अंगलट येणार आहे.