अभ्यास नको म्हणून भावंडांचा पळून जाण्याचा बेत; पोलिसांनी नेले आईवडिलांकडे थेट !
By साहेबराव हिवराळे | Published: January 8, 2024 09:03 PM2024-01-08T21:03:15+5:302024-01-08T21:04:07+5:30
अभ्यासाच्या धाकाने लहानग्या मुलांचे घरातून पलायन, रात्री महाविद्यालयीन युवकांना आला संशय.
वाळूज महानगर : आई-वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितल्याने दोन शाळकरी भावंडांनी घरातून साडेअकरा हजार रुपये घेऊन पुण्याला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार, त्यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता घरातून पोबारा केला. रात्री साडेअकरा वाजता पोलिसांनी त्यांना आईवडिलांच्या स्वाधीन केले. विलास (वय ११) व त्याचा भाऊ कैलास (८) (दोघांचीही नावे बदलली आहेत) (रा. कमळापूर, रांजणगाव) हे दोघे बेपत्ता झाल्याची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली.
या मुलांचे आईवडील जालना जिल्ह्यातील असून, उदरनिर्वाहासाठी एमआयडीसी परिसरात आलेले आहेत. त्यांच्या कामामुळे मुलांकडे लक्ष देण्यास त्यांना
वेळ मिळत नाही. गतवर्षी विलास यास आळंद येथे धार्मिक शिकवणीसाठी व संस्कार वर्गात दाखल केले होते. त्याने तेथे शिक्षण तर घेतलेच नाही, फक्त
तो पुणे शहरात फिरत असे. अखेर त्यास आई-वडील परत घेऊन आले. येथील शाळेत घातले. आई-वडील कामावरून थकून आल्यावर ‘अभ्यास केला की नाही? शाळेत गेला होतास का?’ असे विचारत. ते मुलांना आवडत नसे.
रात्री दोन महाविद्यालयीन युवकांना आला संशय
घरातून पैसे घेऊन पळ काढल्यानंतर नवीन जॅकेट, खेळण्याच्या दोन गाड्या दोघांनी घेतल्या. एक बॅगदेखील घेतली. घरमालक, कुटुंबीय व पोलिस त्यांना
शोधत होते. ते त्यांना दिसले. ते लपून बसले. नवे जॅकेट घातल्यामुळे कोणाच्या नजरेसही ते पडले नसावेत. रात्रीपर्यंत दोघे भाऊ परिसरात लपून
बसले. रात्री साडेअकराच्या सुमारास तीसगाव फाट्याजवळ नगर रोडला येऊन ते पुण्याला जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत होते. या दोन मुलांना पाहून दोन
महाविद्यालयीन युवकांना संशय आला.
त्यांनी विचारपूस केली असता मुलांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. युवकांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस त्यांच्या शोधात होतेच. पोलिसांनी लगेच येऊन मुलांना ताब्यात घेतले व मुलांच्या आई-वडिलांना वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिस उपनिरीक्षक निर्वळ यांनी ही मुले कुटुंबीयांच्या स्वाधीन केली.