‘सिद्धार्थ’मध्ये २ वाघिणींनी दिला २६ बछड्यांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 06:33 PM2019-04-21T18:33:26+5:302019-04-21T18:37:12+5:30
मनपाकडे निधी नसल्याने सफारी पार्कचे स्वप्न अधुरेच
- मुजीब देवणीकर
औैरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात १९९१ पासून आजपर्यंत वाघांच्या सहा जोड्यांनी तब्बल २६ बछड्यांना जन्म दिला. त्यातील १२ बछडे देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले. जागेअभावी प्राणिसंग्रहालयात आज ८ वाघ आहेत. मागील काही वर्षांपासून वाघांचे प्रजननही थांबविण्यात आले आहे. देशभरात वाघांची संख्या वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत असताना औरंगाबादेत वाघांची संख्या आटोक्यात ठेवण्यात येत आहे.
१९९१ मध्ये महापालिकेने प्राणिसंग्रहालयासाठी ओडिशा येथून पांढऱ्या वाघांची एक जोडी आणली होती. प्रमोद आणि भानुप्रिया असे या लोकप्रिय जोडीचे नाव होते. या जोडीने तब्बल दोन दशक पर्यटकांचे मनोरंजन केले. दोघांचाही वृद्धापकाळाने प्राणिसंग्रहालयातच मृत्यू झाला. त्यांच्यापासून तब्बल १५ बछडे जन्माला आले. त्यातील ८ बछडे देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांना वर्ग करण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिले. तब्बल ८ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या प्राणिसंग्रहालयात प्रमोद आणि भानुप्रिया यांच्या अपत्यापैकी एकमेव ‘वीर’ हा पांढरा वाघ शिल्लक आहे.
२००५ मध्ये महापालिकेने पंजाब येथून चार पिवळे वाघ आणले. त्यांची नावे छोटू, गुड्डू, दीप्ती, कमलेश अशी आहेत. त्यांच्यापासून तब्बल ११ बछडे जन्माला आले. ५ बछडे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार देशभरातील इतर प्राणिसंग्रहालयात वर्ग करण्यात आले. तीन बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या प्राणिसंग्रहालयात ७ पिवळे वाघ आहेत. त्यात सिद्धार्थ, समृद्धी, अर्जुन, करिना, करिश्मा, शक्ती, भक्ती यांचा समावेश आहे.
सफारीपार्कचे स्वप्न
मागील १० वर्षांपासून मिटमिटा येथे सफारीपार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा मनपातर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी महसूल विभागाने १०० एकर जमीनही मनपाला दिली. पार्क उभारणीसाठी मनपाच्या खिशात दमडी नसल्याने मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. मनपाने युद्धपातळीवर हा प्रकल्प पूर्ण न केल्यास प्राणिसंग्रहालयाची आॅक्सिजनवर असलेली मान्यता कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकते.
३ वर्षांपासून प्रजनन बंद
देशभरातील लहान प्राणिसंग्रहालयांसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणातर्फे वेगवेगळ्या सूचना देण्यात येतात. औरंगाबादेत वाघांचे प्रजनन पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात यावेत, असे आदेश प्राधिकरणाने तीन वर्षांपूर्वी दिलेले आहेत. सध्या प्राणिसंग्रहालयात एकूण ८ वाघ असून, ते चांगल्या स्थितीत आहेत.
- विजय पाटील, प्रभारी संचालक, प्राणिसंग्रहालय
पिवळे वाघ
04 वाघ पंजाब येथून आणले
11 बछड्यांना त्यांनी दिला जन्म
05 बछड्यांचे स्थलांतर
03 बछड्यांचा मृत्यू
07 बछडे सिद्धार्थमध्ये
पांढरे वाघ
01 नरमादी ओडिशा येथून आणले
15 बछड्यांना जन्म दिला
08 बछड्यांचे स्थलांतर
08 बछड्यांचा मृत्यू
01 बछडा सिद्धार्थमध्ये