विषारी वायूचा पिकांवर दुष्परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 12:22 AM2016-07-22T00:22:51+5:302016-07-22T00:34:37+5:30
राजूर : विषारी वायू गळतीमुळे घटनास्थळा लगतच्या पीक क्षेत्रास बाधा पोहोचली खरी. परंतु, आता दूरवरच्या पिकांवर सुध्दा दुष्परिणाम होण्याची लक्षणे दिसत आहेत.
राजूर : विषारी वायू गळतीमुळे घटनास्थळा लगतच्या पीक क्षेत्रास बाधा पोहोचली खरी. परंतु, आता दूरवरच्या पिकांवर सुध्दा दुष्परिणाम होण्याची लक्षणे दिसत आहेत. यामुळे आता नुकसानग्रस्त पीक क्षेत्राचे पंचनामे लांबणीवर टाकण्यात आले आहेत.
जालना - भोकरदन रस्त्यावरील राजूरजवळ सोमवारी रात्री आठ वाजेपासून ४० तासांपर्यंत क्लोरोसोल्फोनीक अॅसिडची वायू गळती झाली. गळतीमुळे विषारी वायूचे अवाढव्य लोळ उठले. या वायूमुळे परिसरातील मका, कापूस, ऊस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीन, उडीद आदी पिकांना बाधा पोचून पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी २० जुलै रोजी नुकसान भरपाईसाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावर प्रशासनाने शेतकऱ्यांची ओरड लक्षात घेऊन कृषी विभागाला पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले. दरम्यान, गुरूवारी तालुुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर व्यवहारे, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर सपकाळ, कृषी सहाय्यक सुनील रोकडे, सरपंच शिवाजी पुंगळे हे शेतकऱ्यांसह पंचनामे करण्यास गेले. तथापि, पंचनामे करीत असताना दूरवरच्या पिकांना आता रिअॅक्शन येण्यास सुरूवात झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे बाधित पीक क्षेत्र निश्चित करता येत नाही. या परिस्थितीमुळे काही दिवस पंचनामे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पोलिस खात्याकडून जबाब घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.