पंढरपुरातील फूटपाथ झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:52+5:302020-12-11T04:21:52+5:30
वाळूज महानगर : पंढरपुरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या फूटपाथवरील व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. या अतिक्रमणानंतर अनेकांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटल्यामुळे ...
वाळूज महानगर : पंढरपुरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या फूटपाथवरील व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. या अतिक्रमणानंतर अनेकांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
येथील भाजी मंडईपासून कामगार चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फूटपाथवर व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अतिक्रमणे केली आहेत. या फूटपाथच्या जागेवर विविध व्यावसायिक दुकानातील वस्तू तसेच बोर्ड ठेवत असल्यामुळे गावातील नागरिक व पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. गावातील फूटपाथवर अतिक्रमणे झाल्यानंतर अनेकांनी रस्त्यावरच अतिक्रमणे करुन फळ विक्रेते, फेरीवाले, गॅरेज चालक, हॉटेल चालक आदी व्यावसायिकांनी आपले छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले आहेत. या अतिक्रमणामुळे खरेदीसाठी येणारे ग्राहकही रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन सतत वाहतुकीची कोंडी होत असते. विशेष म्हणजे लोडींग रिक्षा चालकही रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. गत पाच-सहा वर्षापूर्वी जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने पंढरपुरातील फूटपाथवरील अतिक्रमणे हटविली होती. मात्र या कारवाईनंतर व्यावसायिकांनी पुन्हा फूटपाथवर कब्जा मिळविल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. फूटपाथ व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यास प्रशासन पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिक व पादचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे.
फोटो ओळ- पंढरपुरातील फूटपाथ गायब झाले असून अनेकांनी रस्त्यावरच अतिक्रमण करुन व्यवसाय थाटल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
फोटो क्रमांक-अतिक्रमण
-------------------------