अंतर्गत जलवाहिन्यांची झाली चाळणी; ठिकठिकाणी वाहिन्या फुटून रस्त्यावर वाहताहेत पाण्याचे लोट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 02:22 PM2020-12-16T14:22:59+5:302020-12-16T14:27:48+5:30

जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत.

Sieve of internal waterways; Lots of water is flowing on the road with broken pipes | अंतर्गत जलवाहिन्यांची झाली चाळणी; ठिकठिकाणी वाहिन्या फुटून रस्त्यावर वाहताहेत पाण्याचे लोट 

अंतर्गत जलवाहिन्यांची झाली चाळणी; ठिकठिकाणी वाहिन्या फुटून रस्त्यावर वाहताहेत पाण्याचे लोट 

googlenewsNext
ठळक मुद्देजुन्या शहरातील जलवाहिन्या नगर परिषद काळात टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांचे आयुष्य किमान दोन दशकांपूर्वी संपलेले आहे.

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. शहरात पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांचे आयुष्य जसे संपलेले आहे तसेच अंतर्गत जलवाहिन्याही कमकुवत झाल्या आहेत. मंगळवारी शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरू होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

जुन्या शहरातील जलवाहिन्या नगर परिषद काळात टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांचे आयुष्य किमान दोन दशकांपूर्वी संपलेले आहे. जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. मंगळवारी रात्री गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागील रोडवर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी चौकात वाहत होते. ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथे फुलांची झाडे विकणारे नागरिक आपल्या कुटुंबासह राहत होते. जलवाहिनी फुटल्याने या कुटुंबांची वाईट अवस्था झाली. फुटलेली जलवाहिनी एमआयडीसीची असू शकते असा युक्तिवाद महापालिकेकडून करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी कोणाची हे शोधण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत होते.

पुंडलिकनगर जलकुंभावरून जाणारी ही जलवाहिनी ३०० मि.मी. व्यासाची असून, ती महापालिकेची असल्याचे उशिरा सांगण्यात आले. 
मोंढ्यातील चौकात जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत होते. विशेष बाब म्हणजे जलवाहिनीतून पाणी वाया जात असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नव्हती. ज्या अधिकाऱ्याकडे हा परिसर आहे, त्यांनी रात्री उशिरा माहिती घेतल्यानंतर गळती असल्याचे मान्य केले, तसेच बुधवारी काम सुरू होईल असे सांगितले. चंपा चौक येथे मागील काही दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. मात्र, येथे गळती नसल्याचा दावा उपअभियंत्यांनी केला.

मोंढ्यातील जलवाहिनी फुटली
जुन्या मोंढ्यातील जलवाहिनी  फुटून  मागील ४ दिवसापासून रस्त्यावर पाणी वाहते आहे. जिन्सी परिसरातील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी जुन्या मोंढ्यातील सर्कल येथे फुटली आहे. त्यातून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत जाऊन जाफरगेट परिसरातील खड्ड्यात तुंबत आहे. त्यात येथे मागील आठवडाभरापासून तीन ठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबली आहे. ते सुद्धा पाणी खड्ड्यात साठून संपूर्ण जाफरगेट परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे येथून हाकेच्या अंतरावर महानगरपलिकाचे झोन कार्यालय आहे. येथील कर्मचाऱ्यांना जलवाहिनी व ड्रेनेज दुरुस्तीची विनंती केली असता आमच्या झोन अधिकाऱ्याला येऊन भेटा, असे उत्तर कर्मचारी देत असल्याचे सतीशचंद्र सिकची यांनी सांगितले.

चंपाचौकत जलवाहिनी फुटली
मागील आठवड्यापासून चंपाचौक येथे जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचते आहे.  रिक्षा, दुचाकी खड्ड्यात आदळत आहेत. येथील दुकानदारांनी सांगितले की, मागील आठवड्यापासून जलवाहिनी फुटली आहे. पण महानगरपालिकेचे कर्मचारी फिरकले नाही. जलवाहिनी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Sieve of internal waterways; Lots of water is flowing on the road with broken pipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.