आकाशवाणी चौकातील सिग्नलची कोंडी फुटली
By | Published: November 22, 2020 09:01 AM2020-11-22T09:01:52+5:302020-11-22T09:01:52+5:30
औरंगाबाद: आकाशवाणी चौकात सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत प्रायोगिक तत्वावर सिग्नल बंद ठेवण्यास शनिवारपासून प्रारंभ झाला. यामुळे आकाशवाणी ...
औरंगाबाद: आकाशवाणी चौकात सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत प्रायोगिक तत्वावर सिग्नल बंद ठेवण्यास शनिवारपासून प्रारंभ झाला. यामुळे आकाशवाणी चौकातील दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी फुटली. चौक ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची विशेष काळजी घेत पोलिसांनी दर तीन मिनिटांनी दोन्हीकडील वाहतूक रोखून त्यांच्यासाठी मार्ग मोकळा केला जात होता.
सर्वाधिक वर्दळीच्या आकाशवाणी चौकात रोज सायंकाळी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर दि.२१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत रोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत चौकातील सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक ) सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक कैलास देशमाने आणि वाहतूक शाखेचे सुमारे १५ कर्मचारी आकाशवाणी चौकात उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजता बॅरिकेड लावून सिग्नल बंद करण्यात आला. त्यामुळे त्रिमूर्ती चौकाकडून महेशनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकाना मोंढानाका उड्डाणपुलाखालून यू टर्न घ्यावा लागला. तर महेशनगरकडून त्रिमूर्तीचौकाकडे जाण्यासाठी वाहनचालकाना सेव्हनहिल पुलाखालून जावे लागले. शासकीय दूध डेअरी चौकातील सिग्नल वर्षभरापासून सायंकाळी ६ ते ८ बंद असते. या चौकात एकेरी वाहतूक सुरू असते. मात्र कालपर्यंत आकाशवाणी चौकात सिग्नल सुरू असल्यामुळे दूध डेअरी चौकातून विना अडथळा पुढे जाणाऱ्या वाहनचालकांना आकाशवाणी चौकात सिग्नलवर थांबावे लागत होते. सिग्नलमुळे आकाशवाणी चौकापासून ते मोंढा नाकापुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागत. दुसऱ्या बाजूला सेव्हन हिल पुलापर्यंत सायंकाळी वाहनांच्या रांगा लागलेल्या असायच्या. शनिवारी सायंकाळी आकाशवाणी सिग्नल बंद करून वाहतूक एकेरी केल्यामुळे वाहनचालकाना विना अडथळा आकाशवाणी चौकातून मार्गक्रमण करता आले.
===
कोट
प्रत्येक चौकात एक अधिकारी, ४ कर्मचारी
आकाशवाणी सिग्नल बंद ठेवल्याने सायंकाळची वाहतूक कोंडी टळल्याचे दिसून आले. यू टर्न घेणाऱ्या वाहनचालकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता मोंढा नाका पुलाखाली आणि सेव्हन हील पुलाखाली एक फौजदार आणि चार वाहतूक पोलीस तैनात असतील.
- सुरेश वानखेडे, एसीपी