सिग्नलचा फ्लॉप शो

By Admin | Published: September 16, 2014 01:01 AM2014-09-16T01:01:22+5:302014-09-16T01:34:15+5:30

मल्हारीकांत देशमुख , परभणी रहदारी सुरळीत करण्याच्या दृष्टीने ‘फिर पहिलेसे’ म्हणत सुरु करण्यात आलेले सिग्नल शहरवासियांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत. बेफिकीर वाहनचालक आणि

Signal Flop Show | सिग्नलचा फ्लॉप शो

सिग्नलचा फ्लॉप शो

googlenewsNext



मल्हारीकांत देशमुख , परभणी
रहदारी सुरळीत करण्याच्या दृष्टीने ‘फिर पहिलेसे’ म्हणत सुरु करण्यात आलेले सिग्नल शहरवासियांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत. बेफिकीर वाहनचालक आणि गोंधळलेले पोलिस कर्मचारी यांच्यातील सावळ्यागोंधळाचा रोड शो सकाळ-संध्याकाळ रंगत आहे. सुरळीत वाहतुकीसाठी शहरात सिग्नल आवश्यक असले तरी यासंदर्भात संबंधितांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. शिवाय जेथे गरज आहे, तेथेच सिग्नलची उभारणी करणे अगत्याचे आहे. यासाठी पोलिस यंत्रणेला बदल करावा लागणार आहे. सध्या सुरु असलेली पद्धत ही सदोष असल्याने त्याचा वाहनधारकांना त्रास होत आहे.
गल्लीबोळांच्या परभणी शहरातून वसमतरस्ता हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. स्टेशनपासून निघणारे दोन आणि दर्गा ते कारेगाव रस्ता हे तीन रस्ते अस्तित्वात आहेत. उर्वरित पाणंद (खड्ड्यांचे रस्ते) याबाबत न बोललेलेच बरे. जिंतूर नाका, जाम नाका, बसस्थानक परिसर, शिवाजी पुतळा या चार ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सिग्नल सुरु करण्यात आले आहेत. अधूनमधून शिवाजी चौकातही सिग्नलची उघडझाप सुरु असते. प्रशासनाच्या दट्ट्यापुढे सिग्नल सुरु करण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे वाटत होते. परंतु, विपरितच घडत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने ऐनपावसाळ्यात लोकांना रस्त्यावर भिजावे लागत आहे. मनपा प्रशासन पोलिसांना, पोलिस वाहनचालकांना दोष देत अपयशाचे खापर परस्परांवर फोडताना दिसते. वाहतूक शाखेने सिग्नल तोडणाऱ्यांना शालीतून मारण्याच्या हेतुने गुलाबपुष्प दिले. परंतु, आता ते फुलांची किंमत दंड रुपाने वसूल करु लागले आहेत.
शहरातील अरुंद रस्ते सिग्नलसाठी खऱ्या अर्थाने अडसर ठरत आहेत. रस्तेच धड नाहीत. मग सिग्नलचा शो कशाला, असा सवाल नागरिक करीत आहेत. ‘कंटीनिव्ह लेफ्ट’ चा नियम कुणीही पाळताना दिसत नाही. डाव्या बाजूने होणारी सलग वाहतूक ठिकठिकाणी बंद पडत आहे. पोलिस यंत्रणा याबाबत वाहनचालकांना कुठल्याच सूचना देत नाही. परिणामी वाहतूक अधिकच विस्कळीत होत आहे. शिवाजी पुतळ्याजवळून स्टेशनकडे जाताना डाव्या बाजूला पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या संरक्षक भिंत व त्याच ठिकाणी तयार झालेला मोठा खड्डा, डाव्या बाजूच्या वाहतुकीला खीळ घालीत आहे. तर वसमतरोडकडे जाताना पत्रकार भवन व त्या लगतच्या दुकानाची ओटे अडसर ठरत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली आहे. सिग्नलचा आग्रह धरणाऱ्या मनपाने रस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिपाक आहे.
बसस्थानक परिसरात सिग्नलची काडीमात्र गरज नाही. या ठिकाणी चौक देखील नाही. परंतु, सिग्नल सुरु करण्यात आले. डॉक्टरलेनकडून येणारा रस्ता आजही वाहतुकीला योग्य नाही. सिग्नलमुळे वाहनांची कोंडी होऊन उड्डाणपुलापर्यंत रांगाच रांगा लागत आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना बसस्थानकात घुसणे देखील कठीण होऊन बसले आहे. यातच वाहनतळ सोडून रस्त्यालगत उभ्या असलेल्या आॅटोरिक्षा, हातगाडे वाहतुकीचा खेळखंडोबा करीत आहेत. जिंतूररोडवरील महाराणा प्रताप चौकात सिग्नल असताना पुन्हा जाम नाका येथे नव्याने सिग्नल सुरु करुन मनपाने काय साध्य केले? दोन सिग्नलमध्ये किती अंतर असावे, याचा विचार झालेला नाही.
४शहरातील इतरही सिग्नल सुरु करण्याचा मनपाचा मनोदय आहे. त्यांचीही अशीच अवस्था झाल्यास वाहनधारकांना फारमोठी शिक्षा मिळणार आहे. मनपा व शहर वाहतूक शाखेने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

Web Title: Signal Flop Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.