कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली घेतल्या सह्या, घर स्वतःच्या नावे करून उचलले कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:04 AM2021-06-06T04:04:31+5:302021-06-06T04:04:31+5:30
दीपक देवीदास धनवटे, लक्ष्मण जनार्दन फुत्रे, योगेश दिगंबर हिवाळे, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या केसमधील आरोपी विक्रम देवीदास ...
दीपक देवीदास धनवटे, लक्ष्मण जनार्दन फुत्रे, योगेश दिगंबर हिवाळे, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या केसमधील आरोपी विक्रम देवीदास गढेकरचा पोलीस शोध घेत आहेत. याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला आणि आरोपी धनवटे हे अनेक वर्षांपासून परस्परांच्या ओळखीचे आहेत. त्याचे त्यांच्या घरी येणे- जाणे असायचे. तेव्हा त्याने त्यांना सांगितले की, कचनेर येथील जैन फाउंडेशनकडून ना व्याज तत्त्वावर तुम्हाला कर्ज काढून देतो. यानंतर काही दिवसांनी तो त्यांना घेऊन सिडको कार्यालय आणि रजिस्ट्री कार्यालयात घेऊन गेला. तेथे त्याने तक्रारदारांच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. याआधारे त्याने त्यांचे घर स्वतःच्या नावे करून घेतले. यानंतर त्याने एल ॲण्ड टी फायनान्स कंपनीकडे तक्रारदारांचे घर तारण ठेवून १५ लाख रुपयांचे कर्ज उचलले. या कर्जाचे दोन वर्षे नियमित हप्ते फेडल्यावर त्याने एयू स्मॉल बँकेकडून १७ लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले. यातील १५ लाख रुपये त्याने एल ॲण्ड टी कंपनीकडे वर्ग करून कर्ज भरणा केला. यानंतर त्याने १७ लाख रुपये कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेचे अधिकारी तक्रारदारांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचे घर आरोपीने स्वतःच्या नावे करून त्यावर कर्ज घेतल्याचे समजले. यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयांत तक्रार अर्ज दिला. हा अर्ज जानेवारीत सिडको पोलिसांकडे आला होता. फौजदार पाटील यांनी चौकशी केली असता आरोपीला कर्ज देताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घरी न जाता कर्ज मंजूर करून आरोपीला मदत केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदवून आरोपी दीपकसह बँक अधिकाऱ्यांना अटक केली.