महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने छत्रपती संभाजीनगर नामकरण समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम
By बापू सोळुंके | Published: March 4, 2023 01:19 PM2023-03-04T13:19:07+5:302023-03-04T13:20:04+5:30
खासदार इम्तियाज जलील यांचे आंदोलन जनतेविरोधात असल्याचा आरोप मनसेने केला.
छत्रपती संभाजीनगर: एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले. खा. जलील यांच्या विरोधात आणि छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज टीव्ही सेंटर येथे स्वाक्षरी अभियान राबविले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजय असो, आदी घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी बोलताना खांबेकर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर असे या शहराचे नामकरण व्हावे, अशी मनोमन इच्छा सामान्य नागरिकांची होती, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सामान्य नागरिकांचे मन ओळखून शहराचे नामकरण केले. असे असताना खासदार इम्तियाज जलील मात्र जनतेविरुद्ध आंदोलन करीत असल्याचे दिसते. जलील यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध का आहे ?हे त्यांनी स्पष्ट करावे. औरंगजेबाचे नाव त्यांना खूपच प्रिय असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांचे नावे औरंगजेब ठेवावे, त्यास आमच्या विरोध नाही, मात्र छत्रपती संभाजी नगर या नावाला विरोध कराल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खासदार जलील यांच्याविरुद्ध यापुढेही आंदोलन करील ,असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, आशिष सुरडकर, बिपीन नाईक, संकेत शेटे राहुल पाटील, मनीष जोगदंडे, रामकृष्ण मोरे, प्रशांत दहिवाडकर ,सागर राजपूत ,सपना ढगे, अनिता लोमटे, महेश डोंगरे, मोनू तुसे, , राजेश रावळकर,किशोर गू ळे, प्रशांत इंगळे अनिता लोमटे सपना ढगे आदींनी सहभाग नोंदविला.